कुरार व्हिलेजमधील पादचारी पूल नव्याने बांधणार, पालिका खर्च करणार 1 कोटी 10 लाख

कुरार व्हिलेज मालाड पूर्व येथील धोकादायक झालेला पूल पाडून या ठिकाणी पालिका नव्याने मजबूत पूल बांधणार आहे. यासाठी 1 कोटी 10 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

कुरार व्हिलेज अनुराधा जनरल स्टोअरजवळ हा पूल आहे. हा पूल धोकादायक झाल्याने नव्याने बांधण्यात यावा अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत होती. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आवाज उठवत जोरदार पाठपुरावा केला. हा पूल तातडीने बांधला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे हा पूल नव्याने बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी संबंधित पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये हा पूल पाडून नव्याने बांधण्याचा अहवाल देण्यात आला होता.

वर्षभरात काम पूर्ण होणार

– स्ट्रक्चरल ऑडिटरच्या शिफारसीनुसार पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली असून 14 फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. हा पूल उभारण्यासाठी कंत्राटदाराला पावसाळा वगळून आठ महिन्यांचा कालावधी दिला आहे.

– यामुळे मार्च 2025 पर्यंत हा पूल नागरिकांसाठी खुला होईल, असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा पूल पाडून नव्याने बांधण्यासाठी काही काळ या भागात वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.