मुंबईकरांना नववर्षाची भेट; भाभा, भगवती,एमटी अगरवाल, शताब्दी रुग्णालयांचा कायापालट होणार

मुंबईकरांना नव्या वर्षात पालिका चार नव्या रुग्णालयांची भेट देणार आहे. यामध्ये वांद्रे भाभा, भगवती बोरिवली, एमटी अगरवाल मुलुंड आणि गोवंडी शताब्दी रुग्णालयांचा कायापालट करून अद्ययावत सुविधाही उपलब्ध करून देणार आहेत.चारही रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणामुळे एकूण दोन हजार 37 बेड वाढणार आहेत. यामध्ये 331 आयसीयू बेडचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत मुंबईच नव्हे, राज्य-देशाच्या कानाकोपऱयातून शेकडो रुग्ण दररोज उपचारांसाठी येतात. केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयांत दररोज मोठी गर्दी असते. त्यामुळे पालिका आपल्या 16 उपनगरीय रुग्णालयांचा विस्तार आणि काही रुग्णालये नव्याने बांधून सुरू करीत आहे. यामध्ये 2024 मध्ये नव्या वर्षात चार नवी रुग्णालये अद्ययावत सुविधांसह सुरू केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

नूतनीकरणात वांद्रे भाभा रुग्णायातील बेड 51ने वाढून 497 तर बोरिवलीच्या भगवती रुग्णालयातील 376 बेडची संख्या 490 होणार आहे. मुलुंडच्या एमटी अगरवाल रुग्णालयात 225 बेडची संख्या 470 वर पोहोचणार आहे. गोवंडी शताब्दी रुग्णालयात 217 बेड असून नव्याने होणाऱया रुग्णालयामुळे बेडची संख्या 580 वर पोहोचणार आहे.