महापालिका बजेट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात; मालमत्ता कर, पाणीपट्टीवाढीची शक्यता नाही

मुंबई महापालिकेचा 2024-25 चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सादर केला जाणार असून मुंबईच्या विकासात भर टाकणाऱया गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, वर्सोवा-दहिसर सागरी सेतू, दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग, समुद्राचे खारे पाणी गोडे यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसह प्रलंबित असलेले भूमिगत मार्केट, कोळीवाडय़ांचा विकास अशा विविध प्रकल्पांवर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्यावरही या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवून मालमत्ता कर व पाणीपट्टीत वाढ करण्यात येणार नाही, असे जाणकरांचे म्हणणे आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल सलग दुसऱयांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या महापालिकेने गेल्या वर्षी 52 हजार 619.7 कोटींचा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 15.52 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पालिका निवडणूक डोळय़ासमोर ठेवून मुंबईकरांवर कुठल्याही करवाढीचा बोजा टाकण्यात आला नव्हता. या वर्षीही लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवून कुठलीही अतिरिक्त करवाढ केली जाणार नाही, असे मत पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने व्यक्त केले आहे.

बेस्टची तीन हजार कोटींची मागणी!
आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाने पालिकेकडे तीन हजार कोटींची मागणी केली आहे. त्यामुळे 2024-25च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाला अनुदानापोटी किती कोटी रुपये मिळतील यावर बेस्टचे भवितव्य ठरणार आहे. बेस्टचे नुकसान कमी करण्यासाठी आणि बेस्टला नफ्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जाणार आहेत, मात्र त्यासाठी महापालिकेकडून आर्थिक बळ मिळाल्यास बेस्टला मोठा आधार मिळणार आहे.

23 जानेवारीपर्यंत सूचना पाठवा
मुंबई महापालिकेने 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मुंबईकरांचा सहभाग वाढावा यासाठी मुंबईकरांकडून सूचना मागवल्या आहेत. या सूचना ई-मेल किंवा थेट पालिका मुख्यालयातील पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. सूचना पाठवण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी असून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. मुंबईकरांनी [email protected] या ई-मेलवर तर लेखी सूचना प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारीत इमारत, मुंबई महापालिका मुख्यालय, फोर्ट, मुंबई-400001 येथे पाठवाव्यात, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.