बहीण-भावाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू, ऍण्टॉप हिल येथील हृदयद्रावक घटना

ऍण्टॉप हिलच्या सेक्टर 5 मध्ये मंगळवारी हृदयद्रावक घटना घडली. सात आणि पाच वर्षांचे बहीण-भाऊ खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडले ते पुन्हा परतलेच नाहीत. काळाने दोघांवर घाला घातला. एका भंगारातल्या कारमध्ये दोघे मृतावस्थेत सापडले. गाडीत गुदमरून दोघांचा मृत्यू झाला असल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत असून याप्रकरणी ऍण्टॉप हिल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मुस्कान (5) आणि साजिद (7) अशी त्या चिमुकल्यांची नावे होती. सेक्टर 5 परिसरात राहणारे मोहबन शेख यांची ही मुले मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर आली. पण बराच वेळ झाला तरी दोघे कुठे दिसत नसल्याने मोहबन व त्याच्या पत्नीने त्यांचा शोध सुरू केला. परिसर पालथा घातला तरी दोघांचा काही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या मोहबनने संध्याकाळी ऍण्टॉप हिल पोलीस ठाणे गाठून मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी लगेच सेक्टर-5 च्या दिशेने धाव घेऊन मुस्कान आणि साजिदचा शोध सुरू केला. पोलिसांनी परिसर पिंजून काढला, पण दोघे कुठे मिळून आले नाहीत. अखेर रात्री साडेनऊ-पावणेदहाच्या सुमारास मोहबनच्या घरापासून हाकेच्या अंतरावर उभ्या असलेल्या भंगारातल्या कारमध्ये पोलिसांनी पाहिले असता सर्वांना धक्काच बसला. दोघे भाऊ-बहीण त्या कारमध्ये निपचित पडलेले आढळून आले. पोलिसांनी लगेच कारचा दरवाजा उघडून दोघांना शीव इस्पितळात नेले, पण तोपर्यंत खूप वेळ झालेली होती. डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून ऍण्टॉप हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, दोन्ही मुले खेळण्याच्या नादात त्या भंगारात उभ्या असलेल्या कारजवळ गेले. दरवाजा उघडून ते आत गेले, पण नंतर त्यांना आतून दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असणार असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. दोघांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असेही सांगण्यात आले, तर त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असून संशयास्पद असे काही दिसून येत नाही. शिवाय मुलांचे पालक व परिसरातील लोकांकडेदेखील चौकशी करण्यात आली. तरी आम्ही अधिक चौकशी करीत असल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.