एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; मे महिन्यात 75 हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता

ऐन लग्नसराईच्या हंगामात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लग्नासाठी सोने खरेदी कशी करायची, असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सोने तब्बल 6,750 रुपयांनी महागले आहे. मे महिन्यात सोन्याचे दर 75 हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच दिवाळीपर्यंत हे दर एक लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.

वायदे बाजारात सध्या सोने-चांदीमध्ये तेजी आहे. तसेच सराफा बाजारातही सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. दिल्ली सराफा बाजारात एप्रिल महिन्यात सोन्याचे दर तब्बल 6,750 रुपयांनी वाढले आहेत. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 74 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे मे महिन्यात सोन्याचे दर हे 75 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर वायदे बाजारात सोन्याने 73 हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.

लग्नसराईच्या हंगामात सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. त्यामुळे एन लग्नसराईत हंगामात सोने खरेदी कशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच सोने-चांदीत आणखी तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. इराण-इस्राईलमधील तणावाने जगाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे जगातील अनेक शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. शेअर बाजारात अनिश्चितता असल्याने सोने- चांदीचे दर वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सुरक्षीत गुंतवणूक म्हणून अनेक गुतंवणूदार आता सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. सध्या चांदीचा भाव हा 100 रुपयांनी वाढून 86,600 रुपये प्रति किलो या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. 86,600 रुपये प्रति किलो हा चांदीचा आतापर्यंतचा विक्रमी दर आहे.