मुंबईतील गाडय़ांची भोपाळमध्ये विक्री 

बनावट अकाउंटच्या माध्यमातून मुंबईतील गाडय़ा भोपाळला नेऊन त्याची विक्री करणाऱयाला अखेर वर्सोवा पोलिसांनी अटक केली. मोहंमद झुबेर खान असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे व्यावसायिक असून ते अंधेरी लोखंडवाला येथे राहतात. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी एक गाडी खरेदी केली होती. पण पार्किंगला जागा नसल्याने त्यांनी गाडी विक्रीचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात त्यांनी एका साईडवर गाडीची जाहिरात केली. जाहिरात केल्यावर त्यांना एका नंबरवरून फोन आला. त्याने गाडी पाहिली. तक्रारदार याचा विश्वास संपादन केला. गाडीची किंमत ठरवण्याचा बहाणा केला. गाडी सुरू होत नसल्याने ती मॅकेनिकला दाखवावी लागेल असे सांगून त्याने चावी घेतली. व्यावसायिकाने त्यांना गाडीची चावी दिली. दिलेली ती चावी लागत नसल्याचा त्याने बहाणा केला.

त्या दिवशी व्यावसायिक हे एका ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांनी ती गाडी वर्सोवा परिसरात पार्क केली होती. रात्री उशिरा ते वर्सोवा येथे आले. त्यांना ती गाडी दिसली नाही. गाडी चोरी झाल्याप्रकरणी त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकातील उपनिरीक्षक नागेश मिसाळ यांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी भोपाळ पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजवरून पोलिसांचे पथक जुना भोपाळ येथे गेले. तेथून पोलिसांनी मोहंमदला ताब्यात घेऊन अटक केली. खानचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो नोकरीच्या निमित्ताने भिवंडी येथे राहू लागला. तेथे राहत असताना झटपट पैशासाठी त्याने फसवणूक करण्यास सुरुवात केली. खानने सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडले होते. त्या अकाउंटवरून तो गाडी विक्री करणाऱयांना संपर्क करत असायचा. फसवणुकीच्या पैशातून तो मौजमजा करत असायचा. त्याने आतापर्यंत किती गाडय़ांची विक्री केली याचा तपास वर्सोवा पोलीस् करत आहेत.