मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाकडून बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश; बनावट भर्ती हँडलरला अटक

मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने बुधवारी केलेल्या कारवाईत बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आणि एका बनावट भरती हँडलरला पकडण्यात आले. दक्षता पथकाकडे नरसिंह पै यांच्याबद्दल लेखी तक्रार आली होती. पै यांनी दावा केला होता की त्यांचे रेल्वेमध्ये मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यांशी चांगले संपर्क आहेत. या ओळखीचा वापर करत आपण 6 लाख रुपये दिल्यास दोन महिन्यांच्या रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देऊ. पै यांनी तक्रारदाराला घाटकोपर स्थानक येथे भेटण्यास बोलावले होते. तसेच सोबत एक लाख रुपयांचा पहिला हप्ता आणण्यास सांगितले होते.

तक्रार दाखल झाल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे ही तक्रार खरी असल्याची पडताळणी दक्षता पथकामार्फत करण्यात आली. त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी आणि निरीक्षकांच्या पथकाने 25 हजार रुपयांच्या सरकारी चलनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने घाटकोपर स्थानक येथे बनावट हँडलरला पकडण्यासाठी सापळा रचला.

आरोपी नरसिंह आर. पै याला 25 हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या ताब्यात सापडलेली रक्कम सापळ्यासाठी दिलेल्या चलनाशी जुळली, जप्त केलेली रक्कम आणि नोटांची संख्या सारखीच होती. याची पृष्टी दक्षता पथकाने केली. आरोपी पै याच्या मोबाईलची तपासणी केली असता तो पैसे गोळा करून बिहारमधील अन्य व्यक्तीस पाठवतो, असे दिसून आले. गुन्हेगार नरसिंह आर. पै याने कबुली दिली की, तो काही लोकांच्या संगनमताने रेल्वेमध्ये खोट्या नियुक्त्या देण्याचे काम करतो. भारतीय दंड संहिता 420 आणि 34अंतर्गत लोहमार्ग पोलीसांनी आरोपी नरसिंह पै वर गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट भरतीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतरांना पकडण्यासाठी पुढील तपास यंत्रणेमार्फत केला जात आहे.

ही कारवाई प्रतीक गोस्वामी, मुख्य दक्षता अधिकारी आणि वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्या मार्गदर्शनाखाली, अजय कुमार, के. डी. मोरे आणि राजकुमार सिंग, मुख्य दक्षता निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी ए. एम. आव्हाड, अरविंद यांच्या दक्षता पथकाने बुडके आणि एस. एम. कोतवाल यांनी केली. सर्व शासकीय यंत्रणेत निवड व भरती प्रक्रिया विशिष्ट मानक पद्धतीची आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये. आजूबाजूला असा कोणताही अनुचित प्रकार सुरू असल्याचे आढळून आल्यास, त्यांनी पोलिसांकडे किंवा संबंधित दक्षता विभागाकडे तक्रार करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.