दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ – छगन भुजबळ

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नसून, सध्या सुरू असलेल्या झुंडशाहीला विरोध आहे, असे सांगत दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ, असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

इंदापूर येथे शनिवारी आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, दौलत शितोळे, राजाभाऊ पाटील, शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, लक्ष्मण हाके, लक्ष्मण गायकवाड, प्रकाश शेंडगे आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, राज्यात अशांतता कोण माजवत आहे? पोलिसांवरील हल्ले थांबवा. आमदारांच्या घरांवर हल्ले होताहेत. अशावेळी विचार करणारा मराठा समाज का बोलत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काही विशिष्ट लोकांना गावबंदी असताना ठराविक लोकांचे गावात स्वागत होत आहे. सगळ्यांच्या संयमाला मर्यादा आहेत. जरांगे पाटील रात्री एक एक वाजेपर्यंत सभा घेतो. आमची सभा मात्र रात्री दहाच्या आत संपवावी लागते, असे सांगत सरकारी अधिकाऱ्यांनी तटस्थपणे वागावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

मराठा समाजामध्ये क्लास वन अधिकारी मोठ्या प्रमाणावर असल्याचे भुजबळ यांनी आकडेवारीनुसार सांगितले. ईडब्ल्यूएस आरक्षणात 85 टक्के मराठा आहेत. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

भुजबळ म्हणाले की, जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे. त्यामध्ये अडचण काय आहे? बिहार सरकार करू शकते तर आपण का करू शकत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्या दोन महिन्यांत दिलेले कुणबी दाखले तातडीने रद्द करावेत, ओबीसींचा नोकरीतील अनुशेष तातडीने भरावा, अशा मागण्याही भुजबळ यांनी केल्या. ‘होय, मी शूद्र आहे. मी ज्या रस्त्यावरून गेलो, ते गोमुत्राने धुतले. मी शूद्र आहे. मग तुम्ही दाखले घेऊन शूद्र का होता,’ असा सवाल त्यांनी केला. २४ तारखेनंतर बघू, नंतर हिशेब करू, अशी भाषा वापरली जाते. ती सरकार ऐकून कसे घेते, असाही सवाल त्यांनी केला. प्रास्ताविक अॅड. कृष्णाजी यादव यांनी केले. पाडुरंग शिंदे यांनी स्वागत केले.