‘चांद्रयान 3’ चे मोठे यश; विक्रम लँडरने पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे तापमानाची पाठवली माहिती

देशाची अतिमहत्त्वाकांक्षी मोहिम असलेली चांद्रयान 3 यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्याने भारताने अंतराळ क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. या मोहिमेतील तीनपेकी दोन उद्दिष्ट्ये सफल झाल्याने इस्रोने जाहीर केले आहे. आता तिसरा टप्प्यावर काम सुरू आहे. तसेच आता चांद्रयान 3 ने मोठे यश मिळवले आहे. विक्रम लँडरने पहिल्यांदाच चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवावरच्या तापमानाची माहिती पाठवली आहे. या माहितीचे विश्लेषण सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे. याबाबतची माहिती रविवारी इस्रोने दिली आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावरील थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE) पेलोड, विक्रम, चांद्रयान 3 लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमानातील बदल समजून घेण्यासाठी दक्षिण ध्रुवाभोवतीच्या चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीच्या तापमानाची माहिती दिली आहे. अद्ययावत आलेख आणि माहिती देताना इस्रोने सांगितले की, मिळालेली माहिती आणि आलेखानुसार चंद्राच्या पृष्ठभागावर आणि चंद्राच्या खोलीवर तापमानात बदल दिसून येत आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाबाबत मिळालेली ही पहिलीच माहिती आहे. त्याबाबतचे विश्लेषण सुरू असल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे.

एका शास्त्रज्ञाने सांगितले की माहितीचे योग्यप्रकारे विश्लेषण केले जात आहे. विक्रमकडून आलेली माहितीवरून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभाग आणि पृष्ठभागापासून खोलीवर बदल दिसून येत आहे. येथील तापमान उणे 10 अंश सेल्सिअस ते उणे 60 अंश सेल्सिअसदरम्यान आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे. ChaSTE पेलोडमध्ये पृष्ठभागाखाली 10 सेमी खोलीपर्यंत पोहोचून तापमान तपासणी करण्याची यंत्रणा आहे. त्यात 10 तापमान सेन्सर बसवले आहेत.

23 ऑगस्ट रोजी विक्रमच्या निर्दोष लँडिंगनंतर इस्रोने चंद्रावरून अधिकृतपणे जाहीर केलेला हा पहिला डेटा आहे. त्यानंतर प्रज्ञान, रोव्हर तैनात करण्यात आले. लँडर आणि रोव्हरवरील पाचही इस्रो पेलोड्सने इन-सीटू प्रयोग सुरू केले आहेत.मिळालेल्या माहितीचे विश्लेषण सुरू असून याबाबतच्या माहितीची सर्वांनाच उत्सुकता आहे. प्रोपल्शन मॉड्यूलवरील पेलोडचा डेटा मिळण्यास सुरुवात झाली आहे. डेटाचे मूलभूत विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर इस्रोकडून चंद्राबाबतची अधिक माहिती देण्यात येणार आहे.