…तर 27 ऑगस्टला होणार चांद्रयानाचं लँडिंग! का म्हणालं इस्रो? वाचा बातमी

रशियाचं लूना -25 हे अंतराळयान चंद्रावर लँडिंग होताना आदळलं आणि रशियाच्या चंद्रमोहिमेला धक्का बसला. अशा परिस्थितीत हिंदुस्थानचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चांद्रयान – 3 मोहिमेला आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सर्वप्रथम पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पण, यासाठी थोडी वाट पाहावी लागू शकते, असं इस्रोने सांगितलं आहे.

14 जुलै 2023 रोजी इस्रोने चांद्रयान 3 अवकाशात प्रक्षेपित केलं. सुमारे 22 दिवसांनी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते चंद्राच्या कक्षेत पोहोचलं होतं. त्यानंतर त्याचा वेग कमी करण्यात आला, जेणेकरून चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत त्याला वाटचाल करता येईल. 17 ऑगस्ट रोजी यानाच्या प्रॉपल्शन मॉड्युलला लँडर-रोवरपासून विलग करण्यात आलं होतं. या दरम्यान लँडरच्या कॅमेऱ्याने चंद्राचे काही फोटोही काढले होते. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.

आता चंद्रावर रात्र आहे, 23 तारखेला चंद्रावर सूर्योदय होईल. चांद्रयान -3 चे लँडर-रोवर ही दोन्ही उपकरणं वीजनिर्मितीसाठी सोलार पॅनल्सचा वापर करू शकतील. म्हणूनच 23 तारखेला लँडिंग नियोजित करण्यात आलं आहे. पण, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने लँडिंगला विलंबही होऊ शकतो, असं म्हटलं आहे. लँडर मॉड्युलची परिस्थिती तसंच चंद्राची स्थिती पाहून चांद्रयानाच्या लँडिंगचा निर्णय घेण्यात येईल. 23 ऑगस्ट रोजी लँडिंगच्या दोन तास आधी याचं परीक्षण करण्यात येईल. जर, त्यावेळी एखादा घटक अनुकूल आढळला नाही, तर आम्ही लँडिंग स्थगित करून 27 ऑगस्ट रोजी हे लँडिंग करू. अर्थात अद्याप तरी अशी कोणतीही समस्या उद्भवलेली नाही, अशी माहिती अहमदाबाद येथील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरच्या संचालकांनी दिली आहे.