चांद्रयानाने सुरू केले माती परीक्षण, चंद्रावर 70 डिग्री तापमान; विक्रमवरील यंत्रणेने पाठवली प्राथमिक माहिती

चंद्राला नेहमीच शीतल अशी उपमा दिली जाते, पण हा चंद्र वाटतो तितका शीतल नसल्याचे समोर आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर तब्बल 70 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हिंदुस्थानच्या ‘चांद्रयान-3’ ने चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. प्रज्ञान रोव्हरने फेरफटका मारल्यानंतर विक्रमवरील यंत्रणेने प्राथमिक माहिती पाठवली आहे.

 विक्रमच्या चेस्ट (मून सर्फेस थर्मो फिजिकल एक्स्परीमेंट) पेलोड या यंत्रणेच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुव परिसरातील पृष्ठभागावरील आणि पृष्ठभागाखालील तापमान किती आहे याचे परीक्षण करण्यात आले. त्याचा आलेख इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक्स (ट्विटर) वरून शेअर केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा आणि तेथील तापमानाचे तसेच मातीचे परीक्षण करणारा हिंदुस्थान हा पहिला देश ठरला आहे. दरम्यान, ही प्राथमिक माहिती असून आणखी माहिती आणि परीक्षण विक्रमवरील यंत्रणा लवकरच  पाठवेल असे इस्रोने म्हटले आहे.

विक्रम चेस्ट पेलोडवर 10 विविध प्रकारचे तापमान मोजणारे सेन्सर लावलेले आहेत. तसेच पेलोडवरील यंत्रणा किंवा उपकरण चंद्राच्या 10 सेमी खोलीपर्यंत जाऊन तापमान मोजू शकते.

तापमान मोजणारे तसेच मातीचे परीक्षण करणारे पेलोड हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील स्पेस फिजिकल लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यात आलेले आहे. या कामी अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे सहकार्य लाभले आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावरून खोलवर गेल्यास तापमानात घट होत जाते. 80 मिमी अंतर्भागात उणे 10 अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरत असल्याचे इस्रोच्या आलेखात दाखवण्यात आले आहे.