गेल्या 2 महिन्यांतील कुणबी प्रमाणपत्रे रोखा, न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करा; छगन भुजबळांचे सरकारलाच आव्हान

गेल्या दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रोखा आणि न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करा, असे थेट आव्हानच आज मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला दिले. मराठा समाजाला सारथी योजनांचा लाभ मिळतो तसा ओबीसी समाजाला लाभ देण्यात यावा आणि ओबीसीतील जातींची जनगणना करावी, अशा मागण्याही त्यांनी ओबीसी एल्गार महामेळाव्यात केल्या.

हिंगोलीतील रामलीला मैदानावर आज रविवारी ओबीसी समाजाचा एल्गार महामेळावा घेण्यात आला. यावेळी भुजबळांनी मनोज जरांगे– पाटील यांना चिमटे काढले. ते म्हणाले की, आमचा विरोध मराठा समाजाला नव्हे तर जाळपोळ करणाऱया झुंडशाहीला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता देण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.

ते म्हणाले की, एक नवीन नेता भुजबळ म्हातारे झाले, असे म्हणत आहे. हो मी म्हातारा झालो आहे. हे जे माझे केस पिकले आहेत. ते एका आंदोलनाने नाही तर शेकडो आंदोलने करून पिकले आहेत, असा टोला त्यांनी आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे नाव न घेता लगावला.

कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या

मराठा समाजाला ज्याप्रमाणे सारथी ज्या योजनांचा लाभ मिळतो त्याप्रमाणेच ओबीसी समाजाला योजनांचा लाभ देण्यात यावा यासह दोन महिन्यांतील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात यावी, शिंदे समिती ताबडतोब रद्द करण्यात यावी, ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी यासह इतर मागण्या भुजबळ यांनी यावेळी केल्या.

यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, आमदार राजेश राठोड, माजी आमदार रामराव वडकुते, बबनराव तायवाडे, लक्ष्मण गायकवाड, कल्याण दळे, शबीर अहमद अन्सारी, स्वागताध्यक्ष बी. डी. चव्हाण, अॅड. सचिन नाईक, सुरेशअप्पा सराफ, अशोक नाईक, डॉ. नागोराव जांबुतकर, प्रकाश राठोड व अॅड. अविनाश भोसीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या

आता प्रस्थापितांकडून ओबीसीत आरक्षण मागून ओबीसी समाजालाच आरक्षणातून बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. एकीकडे गावागावांत राजकीय नेत्यांना गावबंदीचे बॅनर लावून अडवणूक केली जात आहे, तर दुसरीकडे आमदार रोहित पवार व माजी मंत्री राजेश टेपे यांचे संवादयात्रेतून स्वागत केले जात आहे. कुणालाही गावबंदी करून अडविणाऱयांना एक महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेचा कायदा आहे. अशी गावबंदी करणाऱयांवर पोलिसांनी कारवाई केली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. येणाऱया काळात ओबीसीचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अनेकांची दांडी

हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार महामेळाव्यास मंत्री संजय राठोड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, विनय कोरे यांनी दांडी मारली. यावेळी एल्गार संयोजन समितीकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे निवडणुकीच्या अंतिम प्रचारासाठी तेलंगणाला गेल्यामुळे येऊ शकले नाहीत. परंतु आपण ओबीसी समाजासोबत आहोत, असे त्यांनी सांगितल्याची सूचना सर्व समाजबांधवांना सांगण्यात आली.

मराठा आंदोलकांनी ताफा रोखला, काळे झेंडे दाखवले

भुजबळ यांचा ताफा पिंपळगावमार्गे हिंगोलीकडे जात असताना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून ‘छगन भुजबळ यांचा निषेध असो’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. आणखी दोन ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

एल्गार नव्हे, ही दंगल सभा!

ओबीसी एल्गार महामेळाव्यात सर्वच नेत्यांनी जाती जातीत दंगली घडवण्याची भाषा केली. त्यामुळे या सभेला दंगल सभाच म्हटले पाहिजे, असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी केला. ओबीसी महामेळाव्यात छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर हल्लाबोल केला. त्याला उत्तर देताना जरांगे यांनी या सभेला एल्गार नव्हे, दंगल सभा हेच नाव शोभते असे सांगितले.