ब्राह्मण घरात शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाहीत! छगन भुजबळ यांचे वादग्रस्त विधान

आम्हाला सरस्वती, शारदा देवी यांनी काही शिक्षण दिलं नाही, त्यांना आम्ही पाहिलंही नाही, असे वादग्रस्त विधान मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा केले आहे. त्याचबरोबर संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना, कुठल्याच ब्राह्मण घरात शिवाजी, संभाजी नाव ठेवलं जात नाही, असेही ते म्हणाले.

नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या समाज दिन सोहळ्याप्रसंगी शनिवारी भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी आपल्याला शिक्षणाची द्वारं खुली करून दिली. त्यांनी शिक्षण दिलं, त्यामुळे ते आमचे देव आहेत. कुणाला सरस्वती, तर कुणाला शारदा देवी आवडते. पण, त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं नाही, असे ते म्हणाले. लोक म्हणतात, तुम्ही इकडे गेलात, तिकडे गेलात, पण कुठेही गेलो तरी महात्मा फुले, शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

भुजबळांनी स्वतःचे नाव शिवाजी ठेवावे

भुजबळांच्या वक्तव्यावर हिंदू महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भुजबळांनी आपल्या मुलांची नावे शिवाजी किंवा संभाजी अशी का ठेवली नाहीत, असा सवालही हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. भुजबळांनी स्वतःचे नाव बदलून शिवाजी भुजबळ असे ठेवून दाखवावे, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.