Lok Sabha Election 2024 : छगन भुजबळ कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार?

महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट जवळपास कापण्यात आले असून येथून अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. छगन भुजबळ यांनीही महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनीच बैठकीत आपल्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याचे म्हटले होते. त्यामुळे नाशिकमधून भुजबळच लढणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र ते घड्याळ की कमळाच्या चिन्हावर लढणार हे अद्याप स्पष्ट नाही.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असतानाच ते कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याच्या बातम्या फिरू लागल्या. सोशल मीडियामुळे याच आणखी हवा मिळाली. त्यामुळे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. अद्याप तिकीट जाहीर झाले नसताना चिन्हाची चर्चा सुरू झाल्याने अखेर छगन भुजबळ यांनीच समोर येऊन स्पष्टीकरण दिले.

गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींनी या संदर्भात भुजबळ यांना प्रश्न विचारला. नाशिकमधून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिल्लीतून आल्याची बातमी आहे? असे विचारले असता छगन भुजबळ यांनी याला कसलाही आधार नसल्याचे म्हणत ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले. कमळाच्या चिन्हावर लढा अशी ऑफर मला नाही. मात्र नाशिकची जागा अजित पवार गटच लढणार असून तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित दादा यांनी नाशिकची जागा मागून घेतली आहे. त्यावेळी वरतून (दिल्लीतील भाजपचे ज्येष्ठ नेते) सांगण्यात आले की ही जागा तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, पण तिथे छगन भुजबळ यांनाच उभे करा, असे अजित दादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. यामागील कारण काय आहे यावर आपण जास्त बोलू शकत नाही, असेही ते म्हणाले.

नाशिकचा तिढा कधी सुटेल असे विचारले असता भुजबळ म्हणाले की, महायुतीचे लोकं एकत्र बसतील आणि करतील… नाशिकमधील मतदान शेवटी असून त्यास अजून वेळ आहे. भुजबळ यांच्या या विधानामुळे नाशिकच्या जागेवरून अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मिंध्यांची ताकद शून्य

नाशिकच्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी देवळालीमध्ये अजित पवार गटाच्या सरोज अहिरे व सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आमदार आहेत. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे, पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात एड. राहुल ढिकले हे तीन भाजपचे आमदार आहेत. तर इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे हिरामण खोसकर आमदार आहेत. शिंदे गटाचा या मतदारसंघात एकही आमदार नाही. या मतदारसंघा शिंदे यांची ताकदच नाही, असा युक्तीवाद करीत राष्ट्रवादीने नाशिक मतदारसंघासाठी छगन भुजबळांच्या नावाचा आग्रह धरला आहे.