ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण कदापिही मिळणार नाही, बीडमधील सभेत छगन भुजबळांनी निक्षून सांगितले

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. दादागिरी केली जात आहे. भीती निर्माण केली जात आहे. ओबीसी आज संकटात आहे. ओबीसीच्या पाठीशी सर्व समाजाने राहिले पाहिजे. आज ओबीसी जात्यात असेल तर तुम्ही सुपात आहात, ओबीसीही आपला दबाव निर्माण करेल, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण कदापिही मिळणार नाही, असे बीडमधील ओबीसी एल्गार सभेत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी निक्षून सांगितले.

बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडांगणावर ओबीसी समाजाच्या एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण गायकवाड, सचिन साठे, शब्बीर अन्सारी, टी.पी.मुंडे आदी उपस्थित होते. भरगच्च ओबीसी एल्गार समाजाच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ पुढे म्हणाले, बीडमध्ये विचारपूर्वक प्लॅन करून जाळपोळ केली. आगी लावल्या, छत्रपतींच्या घोषणा देत ओबीसींचे घरे जाळण्याचे प्रयत्न झाले. जाळणार्‍यांनी थोडा इतिहास वाचावा, महाराजांसोबत स्वराज्यात कोण होते. राज्यात शांतता बिघडविली जात आहे. दादागिरीची भाषा केली जात आहे. जालन्यात बेकायदेशीर २०० पिस्तुल घेतल्या गले.. काय करत आहेत पोलीस, कारवाई झाली पाहिजे, आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. त्यांना वेगळे आरक्षण द्या, आमचे काही म्हणणे नाही. मात्र चुकीचे आरक्षण देऊ नका, चुकीचे पायंडे पाडू नका, उपोषणकर्त्यांच्या आजूबाजूला पिस्तुलधारी उभे राहत आहेत. चार चार आयोग नेमले, सर्वजण तेच म्हणत आहेत. मराठा समाज सामाजिक मागास नाही. सुप्रीम कोर्टानेही मराठा आरक्षणाची याचिका फेटाळली. मागास आयोगाने घाबरून आपले राजीनामे दिले, सरकारने आता पावले टाकले पाहिजेत, रस्त्यावर आणि कोर्टात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही जबाबदारी सरकारची आहे. जर आरक्षणासाठी ते दबाव निर्माण करत असतील तर ओबीसीही दबाव निर्माण करेल, असे भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले.