छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यास विरोध केला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आज मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत, असा खळबळजनक दावा केला. यावरून राजकीय चर्चेला उधान आले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. नगर जिह्याच्या दौऱ्यावर असलेले जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला. छगन भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

त्या मंत्र्याला आवरा; जड जाईल

मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, विजयाचा क्षण जवळ येत असताना आमचे फलक फाडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ मंत्र्याला सरकारने वेळीच रोखावे, अन्यथा सरकारला जड जाईल, असा गंभीर इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांना दिला.

नगर जिल्हा दौऱ्यावर आलेले मनोज जरांगे-पाटील यांची बुधवारी रात्री संगमनेर येथे, तर आज नेवासा आणि शेवगाव येथे सभा झाली. यावेळी ते बोलत होते.