आमदारकी, मंत्रिपद गेले तरी बेहत्तर; ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही – भुजबळ

chhagan-bhujbal

‘मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्या,’ असे सांगत, ‘आमदारकी, मंत्रिपद गेले तरी बेहत्तर; पण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही,’ असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला. ‘ओबीसींच्या विरोधात भूमिका घेणाऱयांशी लढण्यासाठी सज्ज राहा,’ असे आवाहन त्यांनी केले.

ओबीसी, भटके-विमुक्तांचा एल्गार महामेळावा आज पंढरपूर येथे झाला. यावेळी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, मी मराठा समाज किंवा ओबीसी समाजात भांडण लावत नाही. तेढ निर्माण करीत नाही. मात्र, जालना येथील ‘तो’ नाव न घेता भरसभेत मला शिव्या देत आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. ‘ओबीसी नेत्यांवर हल्ले केले. त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही. शासनाला आरक्षणासाठी धमकी देणे चूक आहे. अमूक एक तारीख सांगणे चूक आहे. हे ‘त्याला’ सांगा. आम्हाला धमकी देऊ नका. गप्प बसलो म्हणजे घाबरतो असे नाही, तर वेळ आल्यावर लाथाडतो,’ असे भुजबळ म्हणाले.