नऊ जम्बो कोविड सेंटरवर सोमवारपासून मुलांचे लसीकरण! आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी

लहान मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पालिकेच्या 9 जम्बो कोविड सेंटरवर 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस दिला जाणार आहे. यासाठी 1 जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानुसार 450 पालिका, खासगी, सरकारी व्हॅक्सिनेशन सेंटरवर डोस दिले जात आहेत. 18 वर्षांवरील नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱया या लसीकरण मोहिमेत 30 डिसेंबरपर्यंत एकूण 1 कोटी 79 लाख डोस दिले आहेत. 18 वर्षांवरील सुमारे 92 लाख पात्र लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला असून 87 टक्के जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या परवानगीनंतर केंद्र सरकार आणि ‘आयसीएमआर’नेही मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिल्यानंतर मुंबईत 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील 9 लाख मुले असून त्यांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे.

  • ए, बी, सी, डी, ई – भायखळा रिचर्डसन अॅण्ड क्रुडास
  • एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम – सोमय्या जम्बो कोविड केंद्र, चुनाभट्टी
  • एफ दक्षिण, जी दक्षिण, जी उत्तर – वरळी ‘एनएससीआय’ जम्बो कोविड केंद्र
  • एच पूर्व, के पूर्व, एच पश्चिम – बीकेसी जम्बो कोविड केंद्र
  • के पश्चिम पी दक्षिण – नेस्को जम्बो कोविड केंद्र गोरेगाव
  • आर दक्षिण, पी उत्तर – मालाड जम्बो कोविड केंद्र
  • आर मध्य, आर उत्तर – दहिसर जम्बो कोविड केंद्र
  • एन, एस- क्रॉम्प्टन अँड ग्रिव्हस कोविड केंद्र, कांजुरमार्ग
  • टी -रिचर्डसन अॅण्ड क्रुडास कोविड केंद्र, मुलुंड