प्रेयसीने चुंबन घेतल्याने प्रियकराच्या कानाचा पडदा फाटला

प्रेमाच्या नात्यात आपल्या भावना व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती प्रियकर आणि प्रेयसी आजमावतात. त्यात शरीराचा स्पर्श हा एक प्रमुख भाग असतो. मात्र, कधी कधी ही जवळीक अंगाशी येऊ शकते. असाच काहीसा प्रकार चीनमध्ये घडली आहे. प्रेयसीचं जोरदार चुंबन घेण्याच्या भरात एका तरुणाच्या कानाचा पडदा फाटल्याची घटना घडली आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना घडली त्या दिवशी प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांसोबत डेटवर गेले होते. त्याच्या प्रेयसीने त्याचं चुंबन घ्यायला सुरुवात केली. प्रेमाच्या भरात तिने जवळपास 10 मिनिटं त्याचं चुंबन घेतलं. त्यावेळी प्रियकराला कानात तीव्र वेदना जाणवली. त्याने त्याबाबत प्रेयसीला सांगितलं. वेदना झाल्यानंतर त्याला आपला कान बंद झाल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी ताबडतोब रुग्णालयात धाव घेतली.

रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचं लक्षात आलं. त्याला वेदनाशामक आणि प्रतिजैविकांच्या औषधांचा डोस सुरू करण्यात आला. आता सुमारे दोन महिने त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याला ऐकू येऊ शकतं, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

विशेष म्हणजे ही दुखापत जोराने चुंबन घेतल्याने झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. जेव्हा माणूस आवेशाने चुंबन घेतो त्यावेळी त्याच्या कानातील हवेच्या दाबात बदल होतात. चुंबनावेळी श्वास फुलल्याने त्याचा थेट परिणाम कानातील हवेच्या दाबावर होतो. इथेही तसंच झाल्याने तो दाब इतका वाढला की प्रियकराच्या कानाच्या पडद्याला भोक पडलं. 2008मध्येही अशाच प्रकारे एक तरुणी एका कानाने बहिरी झाली होती.