अदानींचा चिनी घोटाळा, ओसीसीआरपीचा स्फोटक अहवाल

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर आता उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर नवीन आरोपांचा बॉम्बगोळा पडला आहे. अदानी उद्योग समूहाने गुपचूप स्वतःचेच शेअर्स खरेदी करून शेअर बाजारात लाखो डॉलर्स गुंतवल्याचा ‘चिनी घोटाळा’ ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (ओसीसीआरपी) आपल्या अहवालात उघडकीस आणला आहे. पहिल्यांदाच अदानी समूहाचे मॉरिशसमधील व्यवहाराचा तपशील जाहीर झाला आहे. या आरोपांचे तीव्र पडसाद मुंबई शेअर बाजारात आज उमटले. अवघ्या तीन तासांत अदानी समूहातील कंपन्यांचे तब्बल 35 हजार कोटी रुपये पाण्यात गेले.

24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग संशोधन अहवालात अदानी समूहावर ऑडिट फसवणूक, शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार आणि करचुकवेगिरीचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे अदानी समूह कंपन्यांच्या शेअर्सची मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली होती. शेअर बाजारापासून संसदेपर्यंत पडसाद उमटले होते. अदानी समूहाच्या शेअर्स व्यवहारांतून कमाई करणाऱया कंपन्यांपैकी 3 हिंदुस्थानातील तर 4 मॉरिशसमध्ये आणि फ्रान्स, हाँगकाँग, केमन बेटे, आयर्लंड आणि लंडनमधील प्रत्येकी एक कंपन्या आहेत असे हिंडेनबर्ग अहवालात म्हटले होते. आता ओसीसीआरपीने अदानी समुहाचे मॉरिशस कनेक्शन उघड केल्याने खळबळ माजली आहे.

ओसीसीआरपी काय करते

ओसीसीआरपीची स्थापना युरोप, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत पसरलेल्या 24 ना नफा तत्त्वावरच्या तपासणी संस्थांनी केली आहे. केली गेली आहे. संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविषयी प्रकरणांचे तपशीलवार संशोधन करून ही संस्था पुराव्यांसह अहवाल आणि लेख प्रकाशित करते. अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर बंधू हे या संस्थेचे वित्तीय पाठीराखे आहेत. संस्थेच्या वेबसाइटनुसार, जॉर्ज सोरोसच्या युनिट ओपन सोसायटी फाऊंडेशनद्वारे तसेच, पर्ह्ड फाऊंडेशन, रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि ओक फाऊंडेशन यांचा समावेश असलेल्या इतर संस्थांकडून या संस्थेला अनुदान मिळते.

3 तासांत 35 हजार कोटी बुडाले

ओसीसीआरपीच्या अहवालामुळे उद्योग विश्वात खळबळ उडाली. मुंबई शेअर बाजारात तीव्र पडसाद उमटले. अदानी समुहातील सर्व दहा कंपन्यांच्या शेअर्सची पडझड झाली. अदानी पॉवरचे शेअर्स 3 टक्क्यांनी, अदानी ट्रान्समिशनचे 3.3 टक्क्यांनी घसरले. अदानी एंटरप्रायझेस 2.50 टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये 2.25 टक्क्यांनी पडझड झाली. तीन तासांत अदानी उद्योग समुहाला 35 हजार कोटी रूपयांचा फटका बसल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.

काय आहे चीनी घोटाळा

– ओसीसीआरपीचा अहवाल गार्डियन आणि फायनान्शिअल टाईम्स या वृतपत्रांनी प्रसिद्ध केला आहे.
– अदानी उद्योग समुहातील कंपन्यांनी मॉरिशसमध्ये केलेल्या व्यवहारांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. 2013 ते 2018 या काळात अदानी समुहाच्या कंपन्यांनी स्वतःचेच शेअर्स गुपचूप खरेदी केले.
– गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांच्या पंपन्या आणि संस्थांवर संचालक आणि समभागधारक नासर अली शाबान अहली आणि चांग युंग लिंग यांनी अनेक वर्षे अदानी समुहाच्या शेअर्सची खरेदी-विक्री करून मोठा नफा मिळविला. चांग युंग लिंग हे चिनचे आहेत. त्यामुळे अदानींच्या पंपन्यांवर चिनी संचालक, समभागधारक कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
– अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ओपेक फंडाच्या माध्यमातून (अपारदर्शक फंड) लाखो डॉलर्स गुंतवले गेले. त्यात अदानी कुटुंबातील व्यवसायिक भागीदारांचा अस्पष्ट सहभाग होता असे अहवालात म्हटले आहे.
– अदानी कुटुंबियांनी त्यांचे पैसे विदेशातून हिंदुस्थानातील आपल्याच कंपन्यांमध्ये गुंतविले. त्यामुळे अदानी समुहातील पंपन्यांचे मुल्य वाढले.
– अदानी समुहाच्या अंतर्गत ईमेलच्या फायलींच्या तपासाचा हवाला ओसीसीआरपीने दिला आहे. या तपासात दोन प्रकरणात गुंतवणुकदारांनी ऑफशोर म्हणजे अपारदर्शक पद्धतीने अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री केली.

अदानी समूहाकडून आरोपांचा इन्कार

या नव्या आरोपांचा इन्कार करताना, हे आरोप जॉर्ज सोरोस आणि त्याच्यासारख्या हिंदुस्थानविरोधी गटाची कारस्थाने असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. दहा वर्षांपूर्वीच डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने (डीआरआय) या सर्व आरोपांची चौकशी करून सर्व व्यवहार तपासले आहेत. डीआरआयनंतर निष्पक्ष प्राधिकरण आणि अपलेट ट्रिब्युनलनेही अशा आरोपांत तथ्य नसल्याचे सांगितले होते. अदानी समुहाचे सर्व देशी-विदेशी आर्थिक व्यवहार हे कायदेशीर असल्याचा निर्वाळाही सर्व शासकीय आणि बिगर शासकीय यंत्रणांनी दिल्याचा दावा अदानी समूहाच्या निवेदनात करण्यात आला आहे. मार्च 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपातून अदानी समूहाला क्लीन चिट दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ओसीसीआरपी अहवालातील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांबाबत केलेल्या आरोपांची चौकशी सेबीमार्फत सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले.