तरूण प्रियकरासमोर खरे वय लपविण्यासाठी महिलेने वापरला बनावट पासपोर्ट

चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेने स्वत: पेक्षा कमी वयाच्या प्रियकरापासून वय लपविण्याच्या नादात बनावट पासपोर्ट वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. बीजिंग विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी तपासणी करत असताना महिलेचा पासपोर्टमध्ये काही तरी गडबड असल्याचे जाणवले. यावर महिलेची चौकशी केली असता खरे कारण समोर आले आहे.

बीजिंग विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पासपोर्टमध्ये काही असामान्य गोष्टी आढळून आल्याने महिलेला चौकशीसाठी थांबवले. अधिकाऱ्यांनी बनावट पासपोर्ट वापरणाऱ्या महिलेला तिची इतर कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. कागदपत्रे सादर करण्यास सांगितल्यानंतर महिला घाबरली, आणि तिने अधिकाऱ्याकडून पासपोर्ट हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृत्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्याला संशय आला. तसेच प्रियकराला चेकींग पॉईंटपासून दूर उभे राहण्यास सांगितले.

बराच वेळ वाद घातल्यानंतर अखेर महिलेने अधिकाऱ्यांना दोन पासपोर्ट वापरत असल्याचे उघड केले. महिलेचे खरे वय 41 असून, ती 27 वर्षाची असल्याचे भासवत होती. तिने प्रियकरासोबत असलेल्या नातेसंबंधावर परिणाम होण्याच्या भीतीने आपले वय लपवत असल्याचे सांगितले. याप्रकरणी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिचे दोन्ही पासपोर्ट जप्त करून 3,000 युआन दंड ठोठावण्यात आला.