सत्याचा शोध – हा तर अविवेकी थयथयाट!

>> चंद्रसेन टिळेकर

सुधारकी विचार, परिवर्तनवाद यासाठी महात्मा जोतिबा फुले, राजा राममोहन रॉय यांच्यासारखे समाजसुधारक आग्रही होते. काळाच्या पुढे विचार करणार्या या समाजसुधारकांमुळे समाजात अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घडले. मात्र आजही सनातनी विचारप्रवृत्ती परिवर्तनवादी विचारांना विरोध करते. समाज म्हणून पुढे जायचे असेल तर विवेकी विचारांची सोबत सोडता कामा नये.

‘जोतिबा फुले महात्मा नव्हे, दुरात्मा होते!’
‘राजा राममोहन रॉय ब्रिटिशांना फितूर झालेले धर्मद्रोही होते!’
‘त्या विशिष्ट दिवसांत स्त्रीचे संपूर्ण शरीर विषारी झालेले असते!’
‘अग्निहोत्र केल्याने वातावरण शुद्ध होते!’

ही मुक्ताफळे कोणी मती भ्रष्ट झालेल्या इसमाने अथवा वेड्यांच्या इस्पितळातून सुटून आलेल्या पाम माणसाने उधळलेली नाहीत तर पुरोगामी समजल्या जाणाऱया महाराष्ट्रातून निघणाऱया काही दैनिके साप्ताहिकातून अधूनमधून प्रसिद्ध झालेली विधाने आहेत. आश्चर्य म्हणजे या प्रकारचेही साहित्य आवडीने वाचणारी मंडळी आपल्याला दिसतात, पण याहून अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसे हे साहित्य निम्नस्तरातील अल्पशिक्षित समाजात आवडीने वाचले जाते तसे ते पांढरपेशा वर्गातही चवीने वाचले जाते. लेखाच्या सुरुवातीला जी चार विधाने दिली आहेत त्यावरून अशा प्रकारच्या साहित्याचे विषय काय असतील याची कल्पना येते. थोडा विचार केला तर अशा साहित्याचा हेतूही लक्षात येतो, तो म्हणजे सतत परिवर्तनाच्या विचारांच्या विरोधी उभे रहायचे. आधुनिक विषयांच्या विचारसरणीची खिल्ली उडवायची. जुनाट कालबाह्य विचारांची पाठराखण धर्माच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली करायची.

परिवर्तनाला विरोध करणारी मंडळी ही प्रामुख्याने सनातनी विचारांची असणार हे उघडच आहे. साहजिकच अशी मंडळी समाजसुधारकांच्या विरुद्ध असतात हे सांगायची गरज नाही. युरोपमध्ये 500-600 वर्षांपूर्वी जे प्रबोधन युग अवतरले, ज्याला युरोपियन रेनेसाँस संबोधले जाते, ज्यामुळे संपूर्ण युरोप वैचारिक आणि अंतिमत वैज्ञानिक क्रांतीने उजळून गेला. तशा प्रकारचा रेनेसाँस म्हणजेच प्रबोधन युग दुर्दैवाने आपल्या देशात अवतरले नाही हे जरी खरे असले तरी त्याची काहीशी संक्षिप्त आवृत्ती ही बंगालमध्ये राजा राममोहन रॉय आणि महाराष्ट्रामध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी निर्माण केली हे कोणीही मान्य करील. नेमक्या याच कारणामुळे इथली स्थितीवादी मंडळी या दोघांचा तिरस्कार करताना दिसतात. बंगालमध्ये त्यावेळी ब्रिटिश राज्यकर्ते पुरोहित वर्गाला मंत्र, यज्ञ, अनुष्ठाने इत्यादी धार्मिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनुदान देत. ते राजा राममोहन रॉय यांनी ब्रिटिशांना विनंती करून थांबवले आणि ते अनुदान पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी आधुनिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगात आणायला लावले. ही एकच गोष्ट राजा राममोहन राय यांना धर्मद्रोही ठरवण्यासाठी पुरोहित वर्गाला पुरेशी होती, परंतु त्यात आणखी भर पडली ती राजा राममोहन रॉय यांनी सतीची चाल बंद केल्यामुळे. ही चाल बंद करून आमच्या धर्मात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ढवळाढवळ करू नये अशी मागणी तेव्हा पुरोहित वर्गाने इंग्लंडच्या राणीकडे केली होती.

सनातन्यांचे दुसरे मोठे शत्रू म्हणजे महात्मा जोतिबा फुले! जोतिबांनी तर समाजसुधारणेच्या क्षेत्रात क्रांतीच केली. अचंबित करणाऱ्या त्यांच्या कार्याला एखाद्या डोंगराचीच उपमा द्यावी लागेल. त्यांनी उभ्या केलेल्या या सुधारणेच्या डोंगराबद्दल प्रसिद्ध लेखक प्रा. वि. द. घाटे एके ठिकाणी म्हणतात, “या त्यांनी उभारलेल्या डोंगराच्या कळसाकडे पाहण्याचा प्रयत्न केला तरी आपली टोपी खाली पडते.” अशा या महात्म्याच्या कार्यामुळे सनातन्यांनी जी अंधश्रद्धेची दुकाने थाटली होती ती बंद होण्याची वेळ आली. धर्मांधळेपणा वाढला की धर्मकृत्ये माजतात. साहजिकच त्यांना लागणाऱ्या वस्तूंची, धार्मिक चोपड्या इत्यादी वस्तूंची मागणी वाढते आणि अशा व्यवसायाला बक्कळ बरकत येते. ती सुखासुखी कोण सोडील?

महात्मा फुलेंनी तर धर्मातील अंधश्रद्धेच्या मुळाशीच घाव घातला. त्यांनी धर्माची अत्यंत कठोरपणे चिकित्सा केली, जी धर्ममार्तंडांना धर्माची निंदा वाटली. जोतिबांच्या समाजसुधारणेचा आवाका एवढा प्रचंड होता की, ज्या वर्गाने त्यांना प्राणपणाने विरोध केला त्या वर्गालाही, विशेषत त्यांच्या स्त्री वर्गालाही मोठा फायदा झाला. आज देशामध्ये बंगालबरोबर महाराष्ट्रालाही पुरोगामी विचारांचे राज्य समजले जाते ते जोतिबांनी केलेल्या समाजसुधारणेमुळेच. अर्थात जोतिबांच्या या कार्याला मोठी मदत झाली ती सावित्रीबाईंची. म्हणूनच जोतिबांबरोबरच सावित्रीबाईंनाही ‘आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकार’ म्हटले जाते ते यथार्थच आहे! पण असं असलं तरी सनातन्यांच्या मते मात्र जोतिबा महात्मा नव्हते तर दुरात्मा होते. अपराध एकच तो म्हणजे त्यांनी धर्मात सुधारणा करून खोट्या धर्माच्या आधारे होणारी गोरगरीबांची पिळवणूक थांबवली.

या लेखातील तिसरे विधान हे एका पाखंडी विचाराच्या दैनिकात आलेल्या लेखामधून घेतले आहे. हे दैनिक एकूण अठरा भाषांत निघते आणि त्याचे लक्षावधी वाचक आहेत. या लेखाच्या आधी म्हटल्याप्रमाणे हे मोठ्या श्रद्धेने सुशिक्षित व अल्पशिक्षित वाचकांमध्ये वाचले जाते. धर्मरक्षण हे या दैनिकाचे व्रत आहे असे त्या दैनिकाच्या शीर्षकास्थानी ठळकपणे छापले आहे. स्त्रीचा मासिक धर्म याबद्दल अलीकडे कितीतरी मोठय़ा प्रमाणावर सर्व समाजात प्रबोधन झाले आहे, परंतु हे आमच्या सनातनी धर्मप्रेमींना मान्य नाही. कडव्या धर्मांधळेपणामुळे माणसाच्या मेंदूची कशी शीतपेटी होते याचे हे उदाहरण आहे. या लेखात एके ठिकाणी असा उल्लेख आहे की, ‘रजस्वला स्त्री ज्या ठिकाणी झोपते तिथे विषाणूंची रास पडते’. अडाणीपणाला काही मर्यादा?

लेखाच्या सुरुवातीचे चौथे विधान आहे,
‘अग्निहोत्राने वातावरण शुद्ध होते’. शाळकरी मुलगादेखील असे बोलणार नाही आणि कोणी बोलला तर त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु जाहीरपणे असे छापून समाजाची दिशाभूल केली जाते याला काय म्हणावे? कुठलाही अग्नी कसाही म्हणजे मंत्र म्हणून पेटवला तरी त्यामुळे वातावरण शुद्ध व्हायच्याऐवजी अशुद्धच होणार. कारण कुठल्याही ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो आणि वातावरण त्या प्रमाणात अशुद्ध होते. एवढे प्राथमिक ज्ञान सगळ्यांना असते तरीही अशा अंधश्रद्धा पसरवल्या जातात. कारण त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दुकान थाटून पैसे मिळवता येतात. आता तर शेतकऱ्यांचीही “तुम्ही तुमच्या शेतात अग्निहोत्र पेटवा म्हणजे तुमचे पीक जोमात येईल” अशी दिशाभूल केली जाते. अग्निहोत्र म्हणजे यज्ञाचे धाकटे भावंडच आणि आजही असंख्य लोकांचा यज्ञामुळे होणाऱ्या प्राप्तीवर विश्वास असल्यामुळे या निष्फळ अशा अग्निहोत्रावरही त्यांचा विश्वास बसतो.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, प्रत्येकाने आपली सारासार बुद्धी की, जिला कॉमनसेन्स म्हणतात, ती वापरली की, लगेच आपल्याला कळते की, आपण कुंभार होतोय की गाढव?

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत. महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

[email protected]