मुलींचे फोटो काढल्यामुळे दोन गटांत हाणामारी, राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घटना

तालुक्यातील उंबरे येथे क्लासला जाणाऱ्या मुलींचे मोबाईलमध्ये फोटो काढण्यावरून दोन गटांत जोरदार दगडफेकीसह हाणामारी झाली. या घटनेमुळे उंबरे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राहुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दगडफेक व हाणामारी करणाऱया एका गटातील काही तरुणांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी दहा जणांना राहुरी पोलिसांनी अटक केली असून, काहीजण अद्यापि फरार आहेत.

राजेंद्र रायभान मोहिते (वय 25, रा. गणेशवाडी सोनई, ता. नेवासा), गणेश अशोक सोनवणे (वय 25, रा. श्रीरामवाडी, सोनई, ता. नेवासा), शेखर बाळासाहेब दरंदले, (वय 30, रा. सोनई), सचिन विजय बुऱहाडे (वय 25, रा. शिवाजी चौक राहुरी), नवनाथ भागीनाथ दंडवते (वय 36, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी), संदीप भाऊसाहेब लांडे, (वय 32, रा. लांडेवाडी सोनई), शुभम संजय देवरे (वय 25, रा. स्टेशन रोड, राहुरी), सुनील उत्तम दाभाडे, (वय 26, रा. क्रांती चौक, राहुरी), मारुती बाळासाहेब पवार (वय 30, रा. निंभारी, ता. नेवासा), प्रतीक प्रकाश धनवटे (वय 29, रा. तनपुरे गल्ली, राहुरी) या दहा जणांना अटक केली असून, काही तरुण पसार झाले आहेत. पोलीस पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. सलीम वजीर पठाण (रा. उंबरे) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

उंबरे येथे काही तरुणांनी मुलींचे फोटो मोबाईलमध्ये काढल्याच्या कारणावरून बुधवारपासून वादाला तोंड फुटले होते. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दोन गटांत दगडफेक झाली होती. यावेळी एका प्रार्थनास्थळासह व काही दुकानांवर दगडफेकीची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करून दगडफेक करणाऱया तरुणांना ताब्यात घेतले. सध्या उंबरे परिसरात पोलिसांचा फौजफाटा असल्याने त्या ठिकाणी छावणीचे स्वरूप आले आहे.