पहिली, दुसरीची पुस्तके  पुढील वर्षापासून बदलणार

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र, शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी हे नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2024-25 (जून 2024) हे इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठयपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे इयत्ता पहिली -दुसरीच्या पाठयपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटीलयांनी दिल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष 2023-2024 (जून 2023) पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठयपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठयपुस्तके एकूण 4 भागात उपलब्ध करून दिली आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

पाठय़पुस्तकांची चार भागांत विभागणी

इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठयपुस्तकांची एकूण 4 भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठयपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील,असे कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.