दहावीतील विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्या पिण्याच्या सवई बदलू लागल्या आहेत. त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशात अनेक हृदयविकाराच्या अनेक घटना समोर आल्या. नुकतेच मध्य प्रदेशातील छतरपूरमध्येही हृदयविकाराच्या झटक्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी छतरपूरमधील एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.

या मुलाचे नाव सार्थक टिकरिया (17) असे होते. उद्योगपती आलोक टिकरिया यांचा मुलगा होता. सकाळी शाळेतील सामुहिक प्रार्थने दरम्यान अचानक कोसळला. शाळेतील स्टाफने सार्थकला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला आपला जीव गमवावा लागला. घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थक नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता उठला आणि तयार होऊन शाळेत गेला. सकाळी 7.30 ते 8.00 दरम्यान शाळेतील सर्व मुले सामुहिक प्रार्थनेसाठी रांगेत उभी होती. तेव्हाच सार्थक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. सदर घटनेची माहिती शाळेने सार्थकच्या कुटुंबीयांना कळवली. शाळेतील वरिष्ठांनी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या काहीच उपयोग न झाल्यामुळे सार्थकला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी सार्थकला मृत घोषित केले.

जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ डॉ. अरविंद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थकला जेव्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्यामते, अनेकदा अनुवांशिक कारणांमुळे किंवा रक्तप्रवाहाच्या मार्गावर रासायनिक संतुलन बिघडल्याने अशा घटना घडतात. हृदयाचे ठोके अचानक वाढल्यास हृदय काम करणे बंद करते आणि ती व्यक्ती बेशुद्ध पडते. अशावेळी बचावासाठी केवळ 10 मिनिटे असतात. यावेळेत रुग्णाच्या छातीवर रॅपिड सीपीआर दिल्यास रुग्णाला आणखी काही वेळ मिळतो. काही केसेस मध्ये रुग्णाचा जीव वाचवणे फार कठीण असते.

कुटुंबीयांनी मुलाचे नेत्रदान केले

17 वर्षांचा मुलगा गमावल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या आठवणी जतन करण्यासाठी तसेच मुलाच्या डोळ्यांतून हे जग दुसरं कुणी पाहू शकतं, म्हणून मुलाचे डोळे दान करण्याचा निर्णय सार्थकच्या वडिलांनी घेतला. सार्थकचा अंत्यविधी करण्यापूर्वी शस्त्रक्रियेद्वारे त्याचे डोळे काढण्यात आले.