भरधाव लक्झरीच्या धडकेत पिकअपमधील 3 ठार; 11 जखमी, नगर-पुणे महामार्गावरील अपघात

नगर-पुणे महामार्गावर आज पहाटेच्या सुमाराला लक्झरीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिकअपमधील तीनजण जागीच ठार झाले असून, 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये एक बालिका गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद नगर तालुका पेलिसांत करण्यात आली आहे. पिकअपमधील सर्वजण पुण्यातून लग्नाची खरेदी करून पुन्हा धाराशिव जिह्यातील आपल्या गावी जात होते.

प्रवीण गोरख कागदे (वय 26, रा. मोरगाव, ता. जि. बीड), सारिका मच्छिंद्र कागदे, दीपक चव्हाण, (दोघे रा. पखरूड, ता.भूम, धाराशिव) अशी मृतांची नावे आहेत. सूरज बजरंग कागदे (वय 18), बजरंग शेषराव कागदे, धीरज मच्छिंद्र कागदे (वय 17), मच्छिंद्र शेषराव कागदे, राहुल गोरख कागदे (वय 23), सीता बजरंग कागदे, आरुषी मच्छिंद्र कागदे (वय 9), आरती प्रवीण कागदे (वय 21), आरती बजरंग कागदे (वय 15), श्रुती मच्छिंद्र कागदे (वय 14, सर्व रा. मोरगाव, ता. जि. बीड), धीरज राजाभाऊ जोगदंड (रा. पिंपळगाव, ता. वाशी, धाराशिव), लक्झरीचालक मोहम्मद शेख अशी जखमींची नावे आहेत.

पुणे येथे लग्नाची खरेदी करून पिकअपमधील सर्वजण मोरगावकडे जात होते. आज पहाटे नगर-पुणे महामार्गावर चास शिवारामधील एका पेट्रोल पंपावर पिकअप डिझेल भरण्यासाठी थांबली होती. या गाडीच्या पुढे दुसरे वाहन उभे असल्यामुळे पिकअप रस्त्याच्या कडेला थांबली होती. त्यावेळी पुण्यातून नागपूरकडे लक्झरी जात होती. त्यावेळी लक्झरी चालकाला पुढे थांबलेल्या पिकअपचा अंदाज न आल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये पिकअपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले. त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये एक बालिका आणि लक्झरी चालक मोहम्मद शेख हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच, स्थानिकांसह नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही काळात पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या पथकाने महामार्ग सुरळीत केला.