जो जमीन सरकार की वह जमीन अदानी की…सर्व कंत्राटे मोदींच्या मित्राला, काँग्रेसचा आरोप

‘जो जमीन सरकार की है… वो जमीन अदानी की है’ अशा पद्धतीने धारावीपासून विमानतळ, विमानतळ कॉलनी अशी सर्व कंत्राटे  आपल्या ‘मित्रा’ला देण्याचे काम सध्या सुरू आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत केंद्र सरकारवर  हल्ला केला.

मुंबईवरील चर्चेत भाग घेताना त्यांनी केंद्र सरकारपासून राज्य सरकारचे वाभाडे काढले. सध्या पालिकेवर सरकारची कुरघोडी सुरू आहे. दोन पालकमंत्र्यांना पालिका मुख्यालयात आणून बसवले आहे. पालिका आयुक्तांवर सध्या सरकारचा दबाव आहे. निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांची बदली करण्याची नोटीस दिली आहे. पालिका आयुक्तांची व पालिकेतील अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी यावेळी वर्षा गायकवाड यांनी केली.

धारावीकरांचे हक्क पायदळी

धारावी पुनर्विकासाच्या मुद्दय़ावरून वर्षा गायकवाड यांनी सरकारवर हल्ला केला. धारावीकरांच्या हक्कांना पायदळी तुडवले जात आहे. धारावीकरांना रेल्वेच्या जमिनीवर स्थलांतरित करणार आहेत, पण रेल्वेची जागा धारावीकरांना मालकी हक्काने मिळणार नाही. ही जमीन मालकी हक्काने देण्यास रेल्वेने नकार दिला आहे. धारावीकरांना धारावीतच घर मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सत्ताधारी अस्वस्थ

मोदी व राज्य सरकारवर हल्लाबोल केल्यामुळे सत्ताधारी भाजपचे सदस्य अस्वस्थ झाले. त्यांनी वारंवार हरकतीचा मुद्दा उपस्थित करून वर्षा गायकवाड यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर विरोधकांना बोलू द्यायचे नाही आणि त्यांचे मतही मांडू द्यायचे नाही अशी परिस्थिती असल्याचे त्या म्हणाल्या.

सर्व काही अदानीसाठी

सरकारने सर्व काही मित्रासाठी सुरू ठेवले आहे. सिंधी कॉलनी, रमाबाई नगर, मोतीलाल नगर, अभ्युदय नगर कोणत्याही कॉलनीचा पुनर्विकास असला तरी टीडीआर अदानींकडून घ्यावा लागणार आहे. अदानींसाठी विकास नियंत्रण नियमावली बदलण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दीडशे कोटींचे टेंडर

मुंबईतील डीप क्लिनिंगपासून खड्डे बुजवण्याचे कंत्राट ‘मित्रा’ला दिले जात आहे. विधान परिषदेतील कोणासाठी टेंडर काढले जात आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. गेल्या नऊ दिवसांत दीडशे कोटी रुपयांची टेंडर काढण्यात आली. पालिकेची सध्या लूट सुरू आहे.  मुंबईतल्या विद्युत रोषणाईसाठी सतराशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण चीनचे हे दिवे किती ठिकाणी सुरू आहेत, असा सवाल त्यांनी केला.