संगमनेर तालुक्यात कंटेनर, दुचाकीचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

लोणी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील निमोण गावात झालेल्या कंटेनर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. अपघातातील मृत नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे गावचे असून जखमी अकोले तालुक्यातील गर्दनी गावातील आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण गावात शनिवारी रात्री हा अपघात झाला.

निमोण गावात हे तिघे युवक मोटरसायकलने जात असताना त्यांच्या दुचाकीची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय 30), युवराज धोंडीबा मेंगाळ (वय 29, दोघेही रा. नांदूर शिंगोटे, नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. तर संदीप संतोष आगिवले (रा. गर्दनी, ता. अकोले, जि. नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांना सिन्नरच्या दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळतच संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून ती संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत.