कोरोना पाय पसरतोय! 5 दिवसांच्या क्वारंटाइनसह नविन नियमावली येणार, टास्क फोर्स मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत

कोरोना रुग्णांची वाढती संख्या सरकारची काळजी वाढवत असून यापार्श्वभूमीवर टास्कफोर्स विशेष लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची तयारी देखील सरकारकडून केली जात आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यास पाच दिवस घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून सध्या देण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच नियमावली जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कोविड टास्क फोर्सकडून ही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातील नवा व्हेरिएंट JN.1 आल्यानंतर देशात पुन्हा एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 862 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात याचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीनं गृहविलगीकरणाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन लाटांमध्ये वयस्कर व्यक्तींना मोठ्या प्रमाणात याचा फटका सहन करावा लागला होता. म्हणूनच अशा व्यक्तींसाठी मास्क लावण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी टाळणे, अशा सूचना देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. आजच यासंदर्भातील नियमावली जारी केली जाऊ शकते असं देखील सांगण्यात येत आहे.