माण नदीतून बेसुमार अवैध वाळूउपसा; वाळूमाफियांसमोर प्रशासन हतबल

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या माण नदीपात्रातून दिवसाढवळ्या बेसुमार अवैध वाळूउपसा सुरू आहे. मोठमोठे खड्डे पाडून माण नदी पोखरली जात असून, पात्र कोरडेठाक पडले आहे. नदीकाठी असलेल्या गावातून या वाळूउपशाला अभय मिळत आहे. त्यामुळेच वाळूतस्कर दिवसरात्र वाळूचा उपसा करत शासनाचा कोटय़वधींचा महसूल बुडवत आहेत. वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र, वाळू माफियांसमोर प्रशासन हतबल असल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून अवैध वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. याकरिता स्थानिक तालुका प्रशासनाकडून महसूल पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत दिवसा, रात्री-अपरात्री माण नदीकाठी गस्त घालण्यात येते. याकामी नदीकाठच्या गावातील तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांनादेखील अवैध वाळू उपशावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही पथक आले की तात्पुरता वाळूउपसा बंद केला जातो. पथक पुढे जाताच मागे वाळूउपसा सुरू केला जातो. त्यामुळे माण नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात वाळूउपसा होत आहे.

माण नदीपात्रात वाळूउपसा सुरू असताना कारवाई करण्यासाठी पथक गेले तर त्यांचा गोंधळ उडतो. माण नदीकाठावरील पंढरपूर तालुक्यातील गावातून वाळूउपसा करण्यात येत असताना पकडले जात असेल, तर वाळू तस्कर मंगळवेढा महसूल विभागाच्या हद्दीत पळून जातात. जर मंगळवेढा महसूल पथकाने वाळू उपशावर कारवाईचे सत्र सुरू केले, तर वाळू तस्कर पंढरपूर महसूल विभागाच्या हद्दीत पळून जातात. त्यामुळे कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

घरकुलांसाठी वाळूची जादा किमतीने विक्री

सध्या मोठय़ा प्रमाणात घरकुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची नितांत गरज भासते. त्यामुळे जादा किमतीने तस्कराकडून वाळू खरेदी केली जात आहे. जादा व ताजा पैसा मिळत असल्याने अवैध वाळू उपशाचे प्रमाण वाढले आहे. वाळू तस्कर भरदिवसा ट्रक्टर, टमटम, डंपिंग ट्रॉली, टिपरच्या साहाय्याने वाळू चोरी करीत आहेत. तसेच लगतच्या गावातील वाळू तस्कर दुचाकी, सायकलद्वारे वाळूच्या गोणीची वाहतूक करीत आहेत. तसेच गाढवांद्वारेदेखील मोठय़ा प्रमाणात वाळू तस्करी वाढली आहे. यामुळे माण नदीचे पर्यावरण धोक्यात आले आहे.

नदीपात्रात विहिरी खोदण्याच्या नावाखाली वाळूउपसा

महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता माण नदीपात्रात विहिरी खोदल्या जात आहेत. विहिरी खोदण्याच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात जेसीबी, ट्रॉली, ट्रक्टर, टिपरच्या माध्यमातून अवैध वाळूउपसा करण्यात येत आहे. या वाळू उपशाला गावचे पोलीस पाटील, कोतवाल सहकार्य करीत असल्याचे चित्र दिसून येते.