तज्ञ डॉक्टरांची समिती नेमून कोव्हीशिल्डचे दुष्परिणाम तपासा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या झाल्यामुळे तसेच प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे मोठय़ा संख्येने नागरिकांचे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. हे लक्षात घेऊन सिरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम होतात याबाबत संशोधन करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती नेमावी आणि सर्व काम सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे समिती नेमली गेली तर कोरोना लस घेतल्यामुळे नेमके काय दुष्परिणाम होऊ शकतात, पुन्हा कोरोना लाट आल्यास लस घेणे कितपत फायद्याचे ठरेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहेत.

पेशाने वकील असलेल्या विशाल तिवारी यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात, ही लस घेणे किती धोक्याचे आहे, लशीतील कोणते घटक मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहेत याची संपूर्ण तपासणी करण्यात यावी. हा तपासणी अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीसमोर सादर करण्यात यावा. तसेच ही लस घेतल्यामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

पंपनीने दिली होती टीटीएस आजाराची कबुली

कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन तयार करणाऱया अॅस्ट्राजेनेका या ब्रिटिश पंपनीने या लसीचे काही दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात हे कबूल केले होते. याच पंपनीचा फॉर्म्युला वापरून सिरम इन्स्टिटय़ूटने कोव्हिशिल्ड लस तयार केली. ही लस घेतल्यामुळे काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये टीटीएस म्हणजेच थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम हा आजार होऊ शकतो. या आजारात शरीरात रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होऊ शकतो, असे अॅस्ट्राजेनेका पंपनीने म्हटले होते.

अॅस्ट्राजेनेकावर 51 खटले दाखल

अॅस्ट्राजेनेका पंपनीने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस घेतल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. अनेकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागला. त्यामुळे पंपनीविरोधात आतापर्यंत युकेतील उच्च न्यायालयात 51 खटले दाखल करण्यात आले आहेत. पीडितांनी पंपनीकडून सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

 10 लाखांपैकी 13 जणांवर दुष्परिणाम

अमेरिकन सोसायटी ऑफ हेमॅटोलॉजीच्या अहवालानुसार लसीपासून दुष्परिणाम होण्याचा धोका 10 लाख लोकांपैकी  3 ते 15 जणांना असतो. 90 टक्के बरे होतात. यात मृत्यूची शक्यता केवळ 0.00013 टक्के असते, अशी माहिती रांचीतील इंडीयन मेडीकल सायन्सेसचे न्यूरो सर्जन डॉ. विकास कुमार यांनी दिली.

ब्रिटनमध्ये लसीवर बंदी

अॅस्ट्राजेनेका पंपनीच्या कोव्हिशिल्ड लसीवर बंदी घालण्यात आली. वैज्ञानिकांना ही लस बाजारात आणल्यानंतर काही महिन्यांनी या लशीचा धोका लक्षात आला. यानंतर 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही इतर काही लशींचा डोस द्यावा, असे सुचविण्यात आले. कारण अॅस्ट्राझेनेका लशीमुळे होणारी हानी कोरोनापेक्षाही घातक असल्याचे समोर आले होते.