केवायसी अपडेटच्या नावाने कर्जाचा झोल; बिहारमधील दोघा भामटय़ांना बेडय़ा

केवायसी अपडेटच्या नावाने एका तरुणीला कॉल करून सायबर भामटय़ांनी तिच्या बँक खात्याची माहिती मिळवली. मग त्या माहितीच्या आधारे आरोपींनी तरुणीच्या खात्यावर वैयक्तिक कर्ज घेऊन फसवणूक केली. आरोपींनी शिताफीने इतका खटाटोप केला. पण काळाचौकी पोलिसांनी बिहार गाठून दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यात एका तरुणीचा समावेश आहे.

चिंचपोकळी येथे राहणारी तनिषा चौहान (24) या तरुणीला तिच्या व्हॉट्सऍपवर एका अज्ञात नंबरवरून ऑक्सिस बँक एपीके फाईल आली. मग आरोपीने तिला कॉल करून तो ऑक्सिस बँकेतून बोलत असल्याचे म्हणाला. तुमचे केवायसी आजच्या आजच अपडेट करावे लागणार असे सांगत तनिषाची वैयक्तिक माहिती तिच्या मागे तगादा लावून लिंकमध्ये भरून घेतली. मग त्या माहितीच्या आधारे तनिषाच्या बँक खात्यावर वैयक्तिक कर्ज घेतले.  अशा प्रकारे सायबर गुन्हेगाराने तनिषाची तीन लाख 12 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार तनिषाच्या लक्षात येताच तिने काळाचौकी पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, सायबर अधिकारी शीतल माने तसेच चंद्रशेखर परब, सुभाष रासवे या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बांबींचा पोलिसांनी अभ्यास केला असता आरोपी बिहार राज्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथक बिहारला रवाना झाले आणि तेथील दुर्गम भागात जाऊन लपलेल्या अमित कुमार मालाकार (24) आणि राणीदेवी पासवान (27) या दोघांना पकडून आणले.