गतविजेता अमेरिका शूट‘आऊट’, फिफा महिला वर्ल्ड कप

स्वीडनने शुटआऊटपर्यंत ताणलेल्या थरारक लढतीत बाजी मारत फिफा महिला वर्ल्ड कपमधून गतविजेत्या अमेरिकेला आऊट केले. संपूर्ण लढतीत वर्चस्व गाजविलेल्या अमेरिकेला स्वीडनने अतिरिक्त वेळेपर्यंत गोलशून्य बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. मात्र, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वीडनने 5-4 फरकाने बाजी मारत खळबळजनक निकाल नोंदविला.
खरं तर या संपूर्ण लढतीत अमेरिकन खेळाडूंनी वर्चस्व गाजविले, मात्र स्वीडनची गोलरक्षक जकीरा मुसोविचने गोलपोस्टपुढे डोळय़ात तेल घालून पहारा दिल्याने अमेरिकेचे स्वप्न भंगले.

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वीडनच्या नॅथली ब्योर्नची किक अपयशी ठरली. मग अमेरिकेच्या मेगन रॅपिनोचीही किक चुकली. त्यानंतर अमेरिकन गोलरक्षक एलिसा नेहरने स्वीडनच्या रेबेका ब्लोमक्वस्टीची पेनल्टी किक रोखली, मात्र सोफिया स्मिथच्या खराब किकमुळे पुन्हा एकदा बरोबरी झाली. ज्यावेळी 4-4 अशी बरोबरी होती त्यावेळी ओचहाराची किक जाळीमध्ये गेली अन् स्वीडनला विजयाची संधी निर्माण झाली. लीना हर्टीगच्या गोलला अमेरिकेने पंचाकडे दाद मागितली, मात्र रिह्यूमध्ये तो गोल वैध ठरविल्याने स्वीडनने सनसनाटी विजय मिळविला.

याचबरोबर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अमेरिकेचा संघ इतक्या लवकर बाद झाला. कारण याआधी, प्रत्येक वेळी या संघाने किमान उपांत्य फेरी गाठलेली होती. यंदाच्या स्पर्धेत अमेरिकेने केवळ व्हिएतनामचा पराभव केला. त्यानंतर अमेरिकेला नेदरलॅण्ड्सविरुद्ध 1-1 बरोबरी, तर पोर्तुगालविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. स्वीडनची गाठ आता जपानशी पडणार आहे.

दक्षिण आफ्रिकेला हरवून नेदरलॅण्ड्सची आगेकूच
दुसऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत नेदरलॅण्ड्सने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 गोल फरकाने धुव्वा उडवून फिफा महिला वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. नेदरलॅण्ड्सकडून जिल रुर्ड व लिनेथ बीरेनस्टीन यांनी गोल केले. गोलरक्षक डाफ्ने वान डोमसेलरने दक्षिण आफ्रिकेच्या थेम्बी कगाटलाना हिचे अनेक हल्ले परतावून लावल्यामुळे नेदरलॅण्ड्सला हा विजय मिळविता आला. नेदरलॅण्ड्सपुढे आता स्पेनचे आव्हान असेल.