दिल्लीत बेबी केअरसेंटरला भीषण आग; सात नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

राजकोटमध्ये गेमिंग झोनला लागलेल्या भीषण आगीत 12 लहान मुले होरपळल्याची घटना ताजी असतानाच आता दिल्लीत बेबी केअर सेंटरला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या आगीत 7 नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला. 12 अर्भकांची सुटका करण्यात आली, तर एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून पाच मुले गंभीर आहेत.
रुग्णालयाला आग कशी लागली याबाबत अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे काम सुरू असताना मोठा स्पह्ट झाला आणि रुग्णालयाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

रात्री साडेअकराच्या सुमारास विवेक विहार परिसरातील न्यू बॉर्न बेबी केअर सेंटरला भीषण आग लागल्याचा कॉल मिळाला. अग्निशमन दलाच्या 9 गाडय़ा घटनास्थळी पाठवण्यात आल्या. बचाव कार्यादरम्यान इमारतीतून 12 नवजात अर्भकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले. ही तीन मजली इमारत पूर्णपणे जळून खाक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगीत लाखो रुपयांच्या उपकरणांचे नुकसान झाले असून बाजूच्या इमारतीलाही आग लागली. दरम्यान, स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कीची यांची दिल्लीत आणखीही काही बालक उपचार केंद्रे आहेत. या रुग्णालयाची एनओसी 31 मार्चलाच संपली होती, केवळ 5 बेडची परवानगी असलेल्या या रुग्णालयात 10 हून अधिक बेड लावले होते. तसेच येथे अग्निसुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थाही नव्हती अशी माहिती शहादरा विभागाचे पोलिस उपायुक्त सुरेंद्र चौधरी यांनी दिली. डॉ. कीची यांच्यावर अनेक ठिकाणी बेबी केअर सेंटर उभारताना नियम धाब्यावर बसवण्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, बेबी केअर सेंटरमध्ये घटनेप्रसंगी डय़ुटीवर असलेल्या डॉ. आकाश यांनाही अटक करण्यात आली आहे.

केअर सेंटरच्या मालकाला अटक

– न्यू बॉर्न बेबी केअर सेंटरचे मालक डॉ. नवीन कीची यांना पोलिसांनी अटक केली. आगीच्या दुर्घटनेनंतर डॉ. कीची हे फरार होते. त्यांना पोलिसांनी काही तासांतच हुडकून काढले.