ऐन उन्हाळ्यात दापोलीत पसरली धुके, गारव्याने नागरिक सुखावले

मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख सर्वदुर पसरलेल्या दापोलीत रविवारी चक्क दाट धुक्याची दुलई पसरल्याने वाहन चालकांना यातून मार्ग काढणे जिकरीचे होत होते. कधी अवकाळी पावसाचा शिडकावा , कधी कडक उष्णतेचा कडाका तर कधी हुडहुडी भरणा-या थंडीचा गारठा असे बदलते वातावरण दापोलीत सुरू असून मागील चार दिवस कडक उष्म्याच्या काहीलीने अंगाची लाही लाही झाली असताना रविवारी सकाळी दापोलीत सगळीकडेच दाट धुक्याची दुलई पसरल्याचे मनमोहक चित्र दिसत होते. या धुक्याच्या दुलईत हवेत मात्र चांगलाच गारवा जाणवत होता. यामुळे मागील चार दिवसाच्या उश्म्याच्या काहीलीने हैराण झालेल्या दापोलीकरांना सकाळ सकाळीच गारव्याचा सुखद धक्का मिळाला असे असले तरी धुक्याच्या गारव्याने डांबरी रस्ते पार ओलेंचिंब होत निसरडे झाले होते तर पसरलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना आपल्या ताब्यातील वाहनांना मार्ग काढताना वाहनांचे दिवे लावूनसुध्दा तसे कठीणच होत होते.

दाट धुक्याची दुलई पसरल्याने अनेक ठिकाणचे मार्ग धुक्यात हरवून गेले होते. त्यात सुर्योदयाची धुक्यावर पडणारी किरणे याचे मनमोहारी दृश्य पाहावयास मिळत होते. अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात नयनरम्य दृश्य टिपली. असे रविवारचे दापोलीत वातारवण होते. रविवार असल्याने नेहमीसारखी विद्यार्थ्यांची रस्त्यावर गर्दी नव्हती. मात्र ही दाट धुक्याची दुलई केवळ शहरा पुरती सिमित पसरली नव्हती तर खेडोपाडी सुध्दा असेच सगहीकडे वातावरण होते त्यामुळे दररोजचा शेतीकामासाठी बाहेर पडण्याचा शेतक-यांचा तसेच गुरे चरावयास नेण्यासाठीचा गुराख्यांचा दिनक्रम बदलला होता अशाप्रकारची दाट दुलई पसरली होती. बदलत्या वातावरणामुळे निसर्गाचे सारेच चित्र बदलले आहे. त्याचा परिणाम हा शेती, फळबागा यांचेवर होत आहे.

दापोली हे तसे थंड हवेचेच ठिकाण त्यामुळे दापोलीला मिनी महासबळेश्वर संबोधले जाते. या दापोलीत महाबळेश्वर सारखा गारवा असल्याने दापोलीचे हे ठिकाण ब्रिटीशांनाही आवडले होते. त्यांनी आपल्या सैनिकांचा कॅम्प दापोलीत वसवला होता. त्यामुळे दापोलीची दुसरी ओळख कॅम्प दापोली अशीही सरकार दप्तरी नोंदीला सापडते अशा या दापोलीतील सध्याचे वातावरण हे पार बदलून गेले आहे. हिरव्या दाट गर्द झाडीची जागा आता सिमेंटच्या उंच उंच इमारतीने घेतली आहे. सगळीकडे डोंगर हे उघडे बोडके झाले आहेत अशातच निसर्गाने आपली किमया दाखवत दाट धुक्याची दुलई पसरवत सर्वानाच गारव्याचा एक सुखद धक्का दिला. या दाट धुक्याच्या गारव्याने मात्र दापोलीतील वातारवण आज दिवसभर आल्हादायकच होते.