…तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू!

रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी करत मुलुंडवासीयांनी दिला इशारा

एकाच वेळी 4 लाख धारावीकरांचे मुलुंडमधील 64 एकर जागेवर पुनर्वसन करण्याच्या गृहनिर्माण विभागाच्या सूचनेविरोधात आज हजारो मुलुंडकर रस्त्यावर उतरले. प्रकल्पग्रस्तांचे तसेच धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडवासीयांवर लादू नका, मुलुंडमध्ये पायाभूत सोयीसुविधांवर मोठा ताण निर्माण होऊन परिस्थिती चिघळेल. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर मुलुंडवासीयांकडे मते मागायला येऊ नका, आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा आज मानवी साखळी करून रस्त्यावर उतरलेल्या मुलुंडवासीयांनी सरकारला दिला.

मुलुंडमध्ये मुंबई महापालिकेच्या 64 एकर जागेवर धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 4 लाख लोकांना वसवण्यात येणार असून त्यासाठी गृहनिर्माण विभागाने मुंबई महापालिका आणि नगरविकास विभागाला तशा सूचना केल्या आहेत. मिंधे सरकारच्या या निर्णयामुळे मुलुंडकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी मुलुंडकरांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात हजारो मुलुंडकरांनी एकजूट दाखवत रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी बनवून सरकारला इशारा दिला. मानवी साखळीचे आयोजन अॅड. सागर देवरे यांनी केले होते. जानेवारीपासून धारावीकरांच्या मोठया संख्येने मुलुंडमध्ये होणा-या पुनर्वसनाबाबत मुलुंडमध्ये मान्यवर तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.