दहीहंडी फोडणाऱया गोविंदांसारखे एकमताने काम करा! उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

मुंबई जिल्हा बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी यांचा शिवसेनेत प्रवेश

एकावर एक थर लावून उंचावरील दहीहंडी पह्डणाऱया गोविंदांकडून प्रेरणा घेऊन एकमताने, एकजुटीने काम करा आणि शिवसेना आणखी मजबूत करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना केले.

मुलुंड विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची आज सदिच्छा भेट घेतली. आमदार अपात्रता निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही ठामपणे आपल्यासोबत आहोत, असे सांगतानाच मुलुंड विधानसभेत शिवसेनेचाच भगवा फडकणार, असे वचन या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

यावेळी मुंबई जिल्हा बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी आणि अजित पवार गटाचे भूषण शेलार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. शिवसेनेला आणखी मजबुती देण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे सांगतानाच आगामी निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विक्रोळी विधानसभेच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष मामा पाटील यांनीही आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासोबत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही भगवा खांद्यावर घेऊन शिवसेनेशी नाते जोडले.

याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेते दत्ता दळवी, प्रकाश वाघ, प्रमोद धुरी, भालचंद्र वैद्य, सुरेश हळदणकर, सुरेश शिंदे, पंढरी वैती, फ्रान्सिस डिसूझा, विश्वनाथ म्हाडगुत, जयवंत केणी, मनोहर पेडणेकर, दीपक राणे, रमेश विरकर, भास्कर करळकर, बारकू वीर, शिवाजी सुकाळे, दत्ता देसाई, बळवंत ढोकळे, शिवसेना उपविभागप्रमुख दिनेश जाधव, नितीन चौरे, महिला उपविभाग संघटक नंदिनी सावंत, शाखाप्रमुख राजेश साळी, अमोल संसारे, संजय जाधव, चंद्रकांत शेलार, आनंद पवार, रत्नमाला दळवी, कविता शिर्पे आदी शिवसैनिक उपस्थित होते.