दक्षिण मुंबईत महायुतीत खदखद; यामिनी जाधव यांच्या प्रचारातून नाराज भाजप कार्यकर्त्यांचा काढता पाय

mumbai-south-lok-sabha-constituency

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारापासून लांब राहण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर होईल. या अपेक्षेने प्रचाराला लागलेले भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत ईडी चौकशीचा ससेमिरा आणि गद्दारीचा शिक्का असलेल्या यामिनी जाधव यांच्या प्रचारात उतरून आम्ही आता मतदारांना सामोरे गेल्यास विधानसभा निवडणुकीत आम्हाला किंमत मोजावी लागेल, असे भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता. भाजपचे कार्यकर्तेही प्रचाराला लागले होते. राहुल नार्वेकर तर दगडी चाळीच्या आश्रयाला गेले होते. त्यांनी तर अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेच्या परिवाराचे सदस्य झाल्याची आणि अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही, अशी घोषणा केली होती. दुसरीकडे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वरळीपासून कुलाब्यापासूनचा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. गुजराती, मारवाडी आणि उच्चभ्रू मतदारांमध्ये वातावरण निर्माण केले होते. पण जागावाटपात ही जागा शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना जाहीर झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आहे. ईडी चौकशी सुरू असलेल्या उमेदवाराचा प्रचार आम्ही का करावा, असा सवाल भाजपचे ‘शुचिर्भूत’ कार्यकर्ते विचारत आहेत.