महाविद्यालयांमध्ये राजकीय कार्यक्रम घेऊ नका

विरोधी पक्षांकडून कारवाईसाठी आवश्यक स्वाक्षऱयांची जमवाजमव

प्राचार्यांना लेखी स्वरूपात सूचना द्या, युवासेनेची कुलगुरूंकडे मागणी

मतदार नोंदणीच्या नावाखाली दादरच्या कीर्ती महाविद्यालयात निवडणूक प्रचाराचा घाट घालणाऱया भाजपचा मुखवटा युवासेनेने उतरविला. त्यानंतर युवासेनेच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिले असून विद्यापीठाने कोणत्याही महाविद्यालयाला अशा प्रकारचे राजकीय कार्यक्रम घेऊ नये, अशा लेखी सूचना देण्याची मागणी केली आहे.

नवमतदार नोंदणीच्या नावाखाली कीर्ती महाविद्यालयात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे व्हीडीओ दाखविले. ही बाब समोर येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने याला विरोध केला. भाजपला प्रचारासाठी महाविद्यालयाची दारे खुली केल्यास इतर विद्यार्थी संघटनांनाही महाविद्यालयात कार्यक्रम घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवासेनेने करत कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार यांना निवेदन दिले. तसेच आता विद्यापीठानेही अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन कुलगुरूंच्या पश्चात प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांना दिले.

राजकीय कार्यक्रम न घेण्याबाबत सर्व महाविद्यालयांना लिखित स्वरूपात समज द्यावी. त्यावर कुलगुरूंशी चर्चा करून पत्रक काढण्याचे कुलसचिव यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, किसन सावंत, स्वप्निल सूर्यवंशी, सुशांत गोंजारे, जीत विरा आणि विकास अडुलकर उपस्थित होते.