हिंडेनबर्गनंतर OCCRP च्या अहवालामुळे अदानी समुहाच्या अडचणी वाढल्या, कंपनीने आरोप फेटाळले

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे आधीच अडचणीत असलेल्या अदानी समुहावर आता आणखी मोठं संकट उभं राहिलं आहे. विमानतळांपासून टेलिव्हिजन चॅनेलपर्यंत सर्व गोष्टींमध्ये स्वारस्य घेणाऱ्या या समूहावर स्टॉक फेरफार केल्याचा आरोप होता. आता त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. हा आधुनिक हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक घोटाळा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या जानेवारीत न्यूयॉर्कमधील हिंडेनबर्गने लावलेल्या आरोपामुळे अदानी स्टॉकमध्ये घसरण झाली. अदानींविरोधात निदर्शनं झाली, विरोधकांनी संसदेत यावरून प्रश्न उपस्थित केलं आणि अखेर सर्वोच्च न्यायालयानं चौकशीला त्यांना सामोरं जावं लागत आहे.

हिंडेनबर्गनंतर आता आणखी अदानी समुहावर शेअर्समध्ये फेरफार केल्याचे गंभीर आरोप एका मीडिया संघानं केले आहेत. यामुळे अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) नावाच्या जागतिक मीडिया संघटनेनं गौतम अदानी समुहावर शेअर्समध्ये फेरफारीचा आरोप केला आहे. OCCRPच्या अहवालानुसार, अदानी समुहाने गुपचूपपणे स्वत:चे शेअर्स खरेदी करून शेअर बाजारात लाखो डॉलर्स गुंतवल्याचे आरोप केले आहेत. OCCRP च्या या अहवालाच्या आधारे गार्डियन आणि फायनान्शियल टाइम्सनं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे कारण यात अदानी यांनी केलेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अदानी समुहातील कंपन्यांनी 2013 ते 2018 दरम्यान त्यांच्याच शेअर्समध्ये पैसे गुंतवले असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. OCCRP नं आरोप केला आहे की, प्रमोटर परिवाराच्या भागीदारांद्वारे मॉरिशस येथील एका निनावी गुंतवणूक निधीद्वारे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

दरम्यान, अदानी समुहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.