बालगृहातील 30 मुलांचा शिक्षणाचा मार्ग अबाधित

>> आशीष बनसोडे

निरीक्षण गृहात गेलेल्या मुलांना पुन्हा शाळेत घेण्यापासून अटकाव करणाऱया शाळांना कायदेशीर तंबी देत बाल न्याय मंडळाने 30 मुलांचा ते शिकत असलेल्या शाळेतच पुढील शिक्षण घेण्याचा मार्ग अबाधित ठेवण्याचे काम केले आहे.

अल्पवयीन गुन्हेगार मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डोंगरीच्या बाल निरीक्षण गृहात धाडले जाते. पण तो मुलगा अथवा मुलगी बाल निरीक्षण गृहात गेला म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. तो शिकत असलेल्या शाळेकडून मग टोकाची भूमिका घेतली जाते. असा विद्यार्थी आपल्या शाळेत नकोच, असे म्हणत संबंधित मुलाला एकतर बाहेरून परीक्षा देण्याचा अथवा दुसरीकडे शिकायला जाण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या काही दिवसांत बाल निरीक्षण गृहात गेल्यामुळे 30 विद्यार्थ्यांना अशी अडचण निर्माण झाली होती. मात्र हा प्रकार निरीक्षण गृहातील बाल न्याय मंडळाच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित शाळांना कायदेशीर समज देत त्या मुलांना त्याच शाळेत शिकण्याचा मार्ग मोकळा करून दिला. एखाद्या मुलाने काहीतरी चुकीचे केले म्हणून त्याच्याशी दुजाभाव करणे चुकीचे आहे. त्यामुळे जेव्हा आम्हाला कळले की निरीक्षण गृहात आलेल्या मुलांना ते शिकत असलेल्या शाळांमध्ये पुन्हा घेतले जात नाही. तेव्हा शिक्षण निरीक्षकांच्या माध्यमातून त्या शाळांना आवश्यक ती समज देऊन संबंधित मुलांना त्याच शाळेत शिकण्याचा अधिकार आम्ही अबाधित ठेवल्याचे बाल न्याय मंडळाच्या सदस्या अॅड. सविता रंधे यांनी सांगितले.

एखाद्या मुलाकडून नको ती घटना घडल्यामुळे त्याला शाळेत शिकू द्यायचे नाही हा प्रकार चुकीचा आहे. सुशिक्षित नागरिक, पालक, शिक्षकांनी अशा मुलांना समजून घेण्याबरोबर त्यांच्याकडून पुन्हा कुठली चूक होणार नाही याची काळजी घेत त्यांना जबाबदार नागरिक बनवले पाहिजे. प्रत्येक सुजाण नागरिकाने अशा मुलांबरोबर आमची मुलं शिकवायची कशी अशी भूमिका न घेता, संबंधित मुलाला चांगले शिक्षण घेण्यासाठी हातभार लावायला पाहिजे.

यशश्री महारुळकर, (न्यायाधीश, बाल न्यायमंडळ, डोंगरी)