बिनखात्याचे मंत्री पुढे बसले, शिंदे-भाजप-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये अस्वस्थता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे-भाजप आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्रीही अस्वस्थ होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकदा खेळीमेळीचे वातावरण नव्हते. पण आजच्या या बैठकीत कोणत्याही मंत्र्यांच्या वागणुकीत सहजता दिसून येत नव्हती. तुमच्यामुळे आमच्या गटाची मंत्रीपदे कमी होणार आहेत असे भाव शिंदे-भाजपच्या मंत्र्यांच्या चेहऱयावर दिसत होती.

मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नव्या मंत्र्यांचे स्वागत केले. पण त्यामध्ये उत्साह दिसून येत नव्हता. भाजप-शिंदे गटाच्या मंत्र्यांनीही राष्ट्रवादीच्या नऊ नव्या मंत्र्यांचे फार उत्साहात स्वागत केले नाही. मंत्री परिषद सभागृहातील राऊंड टेबलाच्या मध्यभागी मुख्यमंत्री आणि त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अशी आसन व्यवस्था असते. मग ज्येष्ठतेनुसार मंत्र्यांना आसन दिले जाते. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शेजारी आसन व्यवस्था होती.

यापूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या जवळील आसनावर बसत होते. पण आता राष्ट्रवादीचे मंत्री ज्येष्ठतेनुसार पुढे आले आणि शिंदे-भाजपच्या मंत्र्यांची आसन व्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या आसनापासून लांब गेली. त्यामुळे या दोन्ही गटाच्या मंत्र्यांच्या चेहऱयावर नाराजी स्पष्ट दिसत होती.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक
मंत्रीमंडळ बैठकीतील अस्वस्थता आणि रखडलेल्या खाते वाटपामुळे निर्माण झालेली नाराजी लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी व इतर मंत्र्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची एक बैठक झाली. त्यामुळे तीनही गटात प्रचंड अस्वस्थता असल्याचे स्पष्ट झाले आहे.