मशाल गीतातील हिंदू धर्म, जय भवानी शब्द वगळण्यावर पुनर्विचार; निवडणूक आयोग दोन दिवसांत देणार निर्णय

शिवसेनेच्या मशाल गीतातील ‘हिंदू धर्म’ व ‘जय भवानी’ हे शब्द हटवणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आता निवडणूक आयोग आपल्या आदेशाबाबत पुनर्विचार करणार असून उद्या किंवा परवा यावर निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मशाल गीतातील जय भवानी व आणि हिंदू धर्म हे शब्द काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पण उद्धव ठाकरे यांनी हे दोन्ही शब्द मशाल गीतातून वगळणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे बजरंग बली व प्रभू श्रीरामाच्या नावावर मते मागतात ते चालते का? आधी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. हुकूमशाहीसमोर शिवसेना झुकणार नाही आणि मशाल गीतातून हिंदू धर्म व जय भवानी शब्द काढणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. या मशाल गीतातील हिंदू धर्म व जय भवानी शब्दांवरील आक्षेपाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करणारे पत्र शिवसेनेने निवडणूक आयोगाला पाठवले होते.

यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, शिवसेनेने आयोगाला पत्र दिले असून आक्षेपाबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. अशा स्थितीत 48 तासांत संबंधित पक्षाला आमच्याकडून उत्तर देण्यात येते. उद्धव ठाकरे यांनी जी उदाहरणे दिली आहेत ती जाहीर प्रचारसभांमधील आहेत. सभेतील भाषण आणि जाहिरात यांची तुलना होऊ शकत नाही. भाषणात जर आचारसंहितेचा भंग झाला असेल तर संबंधित अधिकारी निर्णय घेतात. येथे प्रचारगीताचा मुद्दा आहे. प्रचार गीत वापरण्याआधी आयोगाच्या समितीचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. शिवसेनेसह इतर अन्य पक्षाच्या 39 प्रकरणांतदेखील असे आक्षेप घेण्यात आले आहेत. संबंधितांनी त्यातील त्रुटी दूर केल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स जाहिरातीसाठी पूर्वप्रमाणीकरणाची आवश्यक्ता असते असेही ते म्हणाले.

बारामतीत मुक्त चिन्हात बदल नाही
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस असे आहे. तर एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मात्र या चिन्हाच्या मराठी भाषांतरात तुतारी असे लिहिण्यात आले आहे. त्याला सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चोक्कलिंगम म्हणाले की, ट्रम्पेट हे मुक्त चिन्ह आहे. आक्षेप घ्यायचाच असता तर तो चिन्ह वाटप होण्याच्या आधीच घ्यायला हवा होता. तसेच ही मुक्त चिन्हे काही आताच आलेली नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून आहेत. तसेच मराठी भाषांतरदेखील खूप आधीच करण्यात आले आहे. मतदान करते वेळी बॅलट युनिटवर फक्त चिन्हच दिसतात, त्यांचे मराठी भाषांतर खाली दिलेले नसते. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. एकदा मुक्त निवडणूक चिन्ह दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱयाला त्यात बदल करता येत नाही, असेही चोक्कलिंगम म्हणाले.