इंग्लंडची ऍशेस मालिकेत बरोबरीची संधी पावसामुळे वाया, सलग चौथ्यांदा ऍशेसवर ऑस्ट्रेलियाचा कब्जा

एका रोमहर्षक कसोटीचा शेवट दुर्दैवी झाला. सातत्याने बरसणाऱ्या पावसाने इंग्लंडच्या विजयाच्या आशेवर आणि ‘ऍशेस’वर पाणी ओतले आणि इंग्लंडची विजयासाठी पेटलेली  धगधगती मशाल विझली गेली. आक्रमक आणि जबरदस्त खेळामुळे ओल्ड ट्रफर्डवर इंग्लंडने तिसऱ्याच दिवशी आपला विजय जवळजवळ निश्चित केला होता, पण डावाने पराभवाच्या उंबरठय़ावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मदतीला पाऊस धावून आला आणि त्याने केवळ त्यांचाच पराभव टाळला नाही तर सलग चौथ्यांदा ‘ऍशेस’वर कब्जाही मिळवून दिला. चौथी कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे 2-1 ने आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाने ‘ऍशेस’ करंडक यंदाही आपल्याकडे राखला आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 317 धावांवर संपविल्यानंतर इंग्लंडने आक्रमक खेळ करीत झॅक क्राऊली, जॉनी बेअरस्टॉ यांच्या झंझावाती खेळय़ांमुळे 107.4 षटकांत 592 धावांचा डोंगर उभारत 275 धावांची निर्णायक आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 113 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव समोर होता, पण चौथ्या दिवसापासून ऑस्ट्रेलियासाठी मैदानात बरसत असलेल्या वरुणराजाने इंग्लंडला अक्षरशः रडवले. चौथ्या दिवशी केवळ 30 षटकांचा खेळ होऊ शकला. त्यात मार्नस लाबुशेनने 111 धावांची खेळी करत झुंज दिली, पण पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी तो बाद झाला. ऑस्ट्रेलिया 5 बाद 214 अशा स्थितीत होता. त्यांना डावाचा पराभव टाळण्यासाठी 61 धावांची गरज होती आणि इंग्लंडला विजयासाठी पावसाचे थांबणे गरजेचे होते. पण पावसाने ऑस्ट्रेलियालाच मदत केली. तो शेवटपर्यंत थांबला नाही आणि एका थरारक सामन्याचा शेवट पावसाने दुर्दैवी केला.

चौथी कसोटी अनिर्णित राहिल्याने इंग्लंडचे मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधून आपले ‘ऍशेस’ जिंकण्याच्या आशांची अक्षरशः राखरांगोळी झाली. त्यामुळे जर आता पाचवी आणि अखेरची कसोटी जिंकली तरी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल आणि गतविजेता ऑस्ट्रेलियाकडेच प्रतिष्ठsचा ‘ऍशेस’ करंडक राहिल.

‘ऍशेस’ इंग्लंडपासून दूरच

2015 साली झालेल्या ‘ऍशेस’ मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3-2 ने पराभव करत ‘ऍशेस’ ट्रॉफी जिंकली होती. मात्र त्यानंतर 2017-18 साली झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5-0 ने व्हाईटवॉश केला होता. मग 2019 साली पुन्हा इंग्लंडने मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली, पण ट्रॉफी ऑस्ट्रेलियानेच राखली. मात्र 2021-22 साली झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 4-0 ने धुव्वा उडवला होता. यंदा इंग्लंडकडून खूप अपेक्षा होत्या, पण पहिल्या दोन्ही थरारक कसोटीत हरले, पण तिसरी कसोटी जिंकून इंग्लंडने कमबॅक केले. मँचेस्टर कसोटीवरही इंग्लंडचेच वर्चस्व होते, पण पावसाने त्यांच्या ‘ऍशेस’ जिंकण्याच्या आशा पावसात भिजवल्या.