ना सलमान, ना शाहरुख; रजनीकांत ठरले सर्वात महागडे अभिनेते

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण, या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना ‘जेलर’ या चित्रपटासाठी तब्बल 210 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. मानधनाच्या बाबतीत त्यांनी शाहरुख, सलमान, अक्षय, अल्लू अर्जुन, प्रभास या आघाडीच्या अभिनेत्यांना धोबीपछाड दिली आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ या चित्रपटातून रजनीकांत यांनी दमदार कमबॅक केले आहे. या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सन पिक्चर्सने एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ‘जेलर’ या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशाबद्दल निर्माते कलानिधी मारन हे रजनीकांत यांना चेक देताना दिसत आहेत. याशिवाय सन पिक्चर्सने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात निर्मात्यांनी रजनीकांत यांना बीएमडब्ल्यू एक्स 7 ही अलिशान कार भेट दिल्याचे दिसत आहे.