Paytm पेटीएम बँकेद्वारे पीएफशी निगडीत व्यवहार करता येणार नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकेवर (Paytm Payments Bank) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या या धक्क्यानंतर पेटीएमला आणकी दोन धक्के बसले आहेत. पहिला म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेटीएम पेमेंट बँकेत पीएफची रक्कम जमा करता येणार नाही तसेच पेटीएम पेमेंट बँकेचा वापर पीएफचे दावे निकाली काढण्यासाठी करता येणार नाही असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जाहीर केले आहे. याचा परिणाम पेटीएमच्या समभागांवर दिसत असून समभागांची किंमत सपाटून आपटली आहे.

अग्रवाल यांचा राजीनामा

पेटीएमच्या स्वतंत्र संचालिका असलेल्या मंजू अग्रवाल यांनी काल राजीनामा दिला. यामुळे आज सकाळीच पेटीएमच्या समभागांच्या किंमतीला ग्रहण लागलेलं होतं. त्यात भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेटीएमला दणका दिला, ज्यामुळे समभागांच्या किंमती आणखीनच कमी झाल्या. 8 फेब्रुवारी 2024 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने एक परिपत्रक जारी केले असून यात म्हटले आहे की 23 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट बँक खात्यांशी निगडीत खात्यांचे दावे स्वीकारले जाणार नाही. गेल्या वर्षी संघटनेने पेटीएम पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट बँकेच्या खात्यांमध्ये पीएफ संबंधीची रक्कम जमा करण्यास परवानगी दिली होती.

शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात होताच पेटीएमच्या समभागाने लाल झेंडा फडकावला. पेटीएम चे समभागांची किमत 6.73 टक्क्यांनी पडून 416 रुपयांवर आली होती. एका महिन्यात या समभागाच्या किंमती 39.76 टक्क्यांनी घसरल्या आहेत.