मसाजच्या बहाण्याने बोलावून गुगल पेद्वारे खंडणी वसुली

उत्तम मसाज मिळेल असे सांगत वाकोला येथील एका हॉटेलात बोलावून ते भामटे संबंधिताचा पद्धतशीर गेम करायचे. मसाजसाठी ग्राहक आल्यावर त्याला हॉटेलातील एका खोलीत घेऊन मग देशी कट्टय़ाचा धाक दाखवला जायचा. त्याआधारे मग त्या व्यक्तीचा मोबाईल, किमती ऐवज, रोकड काढून घ्यायचे. पैसे नसतील तर गुगल पेद्वारे खंडणी उकळली जायची. अशा प्रकारे लुटमार करणारी सात जणांची टोळी वाकोला पोलिसांनी गजाआड केली आहे.

सूरज (नाव बदललेले) यांना नीलेश सरोज या तरुणाने संपर्क केला व आम्ही नवीन स्पा सुरू केला असून तेथे उत्तम सुविधा उपलब्ध असल्याचे सूरजला सांगितले. त्याप्रमाणे सूरजने मसाज करण्यासाठी इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला 7 जुलैच्या संध्याकाळी वाकोला येथील बाबा होम्स या हॉटेलात बोलविण्यात आले. सूरज त्या हॉटेलात गेल्यानंतर त्याला एका खोलीत नेण्यात आले. तेथे नीलेश आणि त्याचा साथीदार आधीच होते. सूरज खोलीत जाताच नीलेशने त्याला देशी कट्टय़ाचा धाक दाखवला व त्याच्याकडील 10 हजार रोख काढून घेऊन 85 हजार रुपये गुगल पेद्वारे नीलेश व त्याच्या अन्य चार साथीदारांच्या बँक खात्यावर वळते करून घेतले. या धक्कादायक प्रकारानंतर सूरजने वाकोला पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी खंडणी, लुटमारीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पाटील, रितेश माळी, अरुण बंडगर, सहदेव डोळे, सुनीता घाडगे व पथकाने तपास सुरू केला.

नीलेश या गुह्याचा मास्टरमाइंड असून त्याला त्याचा जुना मित्र सपोनकुमार शीट याने साथ दिली. नीलेश आधी स्पा चालवायचा, परंतु त्यात तोटा झाल्यानंतर त्याने तो स्पा बंद केला. त्यानंतर झटपट पैसा कमाविण्यासाठी सपोनच्या मदतीने ग्राहकांना स्पाच्या नावाखाली बोलावून त्यांची लुटमार करायचे ठरवले. यासाठी त्यांनी विशाल, आदित्य आणि सुरेश यांना गावावरून बोलावून घेतले. शिवाय त्या हॉटेलात काम करणारे कुलदीप आणि सुरेश यांनाही हाताशी घेतले. नीलेश ग्राहकांना बोलावण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या संपर्क क्रमांकाचा वापर करायचा.

कट्टा, काडतुसे, रोकड, मोबाईल हस्तगत

या गुह्यातील एक आरोपी सपोनकुमार शीट (38) याला जुहू येथून उचलले. तर विशाल सिंग (20), आदित्य सरोज (19), सुरेश सरोज (21) आणि नीलेश सरोज अशा चौघांना अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात पकडण्यात आले. याशिवाय गुह्यातील अन्य दोघे सुरेश विश्वकर्मा आणि कुलदीप सिंग या दोघांना बाबा होम्स हॉटेलातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, नऊ मोबाईल, 10 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

बदनामीच्या भीतीने कोणी पुढे नाही आले

अटक झालेल्या सात भामटय़ांनी याआधी पाच जणांना अशा प्रकारे लुटले असल्याचे समोर आले आहे. मसाजसाठी गेल्यानंतर आपल्याला लुटण्यात आले ही बाब सर्वांना समजली तर बदनामी होईल या भीतीपोटी कोणी तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही. परंतु सूरजने हिंमत करून तक्रार दिली. त्यामुळे त्या सात भामटय़ांचा खेळ खल्लास झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.