दुहेरी हत्याकांडप्रकरणी माजी खासदाराला जन्मठेपेची शिक्षा

supreme-court

दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी खासदार प्रभूनाथ सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 1995 साली घडलेल्या या दुहेरी हत्याकांडप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मार्च 1995 मध्ये बिहारच्या सारण जिल्ह्यातील छपरा येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दोघांची हत्या झाली होती. राजेंद्र राय आणि दरोगा राय अशी या दोघांची नावे आहेत. या हत्येप्रकरणी प्रभूनाथ सिंह यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने प्रभूनाथ सिंह यांना शिक्षा सुनावतेवेळी राजेंद्र राय आणि दरोगा राय यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना 5 लाख रुपये द्यावेत असे आदेश देण्यात आले आहेत. प्रभूनाथ सिंह यांना सदर प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने आणि पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय बदल प्रभूनाथ सिंह यांना शिक्षा ठोठावली आहे. सिंह यांच्यावर हत्येचा हा पहिला आरोप नाहीये. 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रभुनाथ यांचा पराभव करणाऱ्या अशोक सिंह यांच्या हत्येप्रकरणी प्रभूनाथ सिंह हे हजारीबाग तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.