यवतमाळ – सज्जनगड मठातील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा, चार जणांना अटक

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

यवतमाळ तालुक्यातील तळेगाव शिवारात सज्जनगड मठात एका वयोवृद्ध वैद्यासह, महिला सेवेकऱ्याची हत्या करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी या दोघांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी काही तासांतच या दोघांच्या मारेकऱ्यांना शोधून काढले आहे. लक्ष्मण उर्फ चरणदास शेंडे आणि सेवेकरी पुष्पा बापूराव होले यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आशिष ज्ञानेश्वर लिलारे, शुभम सुभाष बैठवार, सुरज सुभाष बैठवार, अशोक पांडुरंग भगत अशी या आरोपींची नावे आहेत. हे चौघेही जण मठामध्ये चोरी करण्यासाठी गेले होते. चोरी करण्यासाठी मठात घुसलो असताना आपण लक्ष्मण उर्फ चरणदास शेंडे आणि सेवकरी पुष्पा बापूराव होले यांची हत्या केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले

यवतमाळजवळ असलेल्या एका मठात दुहेरी हत्याकांड घडले. मठामध्ये असलेले वयोवृद्ध वैद्य लक्ष्मण उर्फ चरणदास चंपत शेंडे (95, रा. कापशी ता. राळेगाव हल्ली मुक्काम, सज्जनगड) आणि पुष्पा बापुराव होले (60, रा. कळंब, हल्ली मुक्काम, सज्जनगड) यांची हत्या करण्यात आली. हा मठ यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या सज्जनगड भागात आहे. हे हत्याकांड मंगळवारी सकाळी उघडकीस आले आहे.चरणदास शेंडे हे वैद्य होते आणि पुष्पा होले या मठातील सेवेकरी होत्या.

आयुर्वेदीक औषधांसाठी प्रसिद्ध होते चरणदास शेंडे

यवतमाळ शहरापासून काही अंतरावर असलेला सज्जनगड मठ हा पांढरकवडा मार्गावर स्थित आहे. चरणदास शेंडे गेली अनेक वर्ष या मठात राहात होते. आयुर्वेदाची त्यांना जाण असल्याने आणि आयुर्वेदिक औषधांबाबत त्यांना माहिती असल्याने ते गरजूंना आयुर्वेदीक औषधे द्यायचे. त्यांच्या हाताला गुण असल्याने त्यांच्याकडून औषधे घेण्यासाठी इतर जिल्ह्यातूनही रुग्ण इथे येत होते. कळंबच्या रहिवासी असलेल्या पुष्पा होले यांना क्षयरोग झाला होता. त्या उपचारासाठी या मठात आल्या होत्या. वैद्यांच्या औषधांनी त्यांचा क्षयरोग बरा झाल्याने त्यांनी या मठातच सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.

या मठामध्ये म्हशी आणि कोंबड्या पाळण्यात आल्या होत्या आणि त्यांची निगा राखण्यासाठी एका कर्मचाऱ्याला ठेवलं होतं. या कर्मचाऱ्याला बरं नसल्याने त्याच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्याला ठेवले होते. मंगळवारी सकाळी हा कर्मचारी साफसफाईसाठी आला असताना त्याला खराटा दिसत नव्हता. यामुळे त्याने पुष्पा होले यांना आवाज दिला होता. त्या प्रतिसाद देत नसल्याने त्याने खोलीत जाऊन पुष्पा यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पुष्पा यांना जागे करण्याचा प्रयत्न करूनही त्या प्रतिसाद देत नव्हत्या. चरणदास शेंडे देखील प्रतिसाद देत नव्हते. यामुळे या तरुणाने गावातील लोकांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार, ग्रामिण ठाणेदार प्रकाश तुनकलवार, शहर ठाणेदार सतिश चवरे यांच्यासह एलसीबी, पथक घटनास्थळी दाखल झाले होते.