पॉइंट रिडिमच्या नावाखाली करायचे फसवणूक

डेबिट कार्डचे पॉइंट रिडिम करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून फसवणूक करणाऱ्या आकाश आणि गोपाल अग्रवाल यांच्या अंधेरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

तक्रारदाराला डेबिट कार्डचे पॉइंट रिडिम करण्याबाबत एक मेसेज आला त्यामध्ये एक लिंक होती. त्या लिंकवर  एका खासगी बँकेचे वेब पेज उघडले गेले. त्याने आयडी आणि पासवर्ड टाकल्यावर त्यांना एक ओटीपी आला. हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे त्याने बँक खात्याचा तपशील तपासला. त्याच्या खात्यातून 3 लाख 78 हजार रुपये काढले गेले होते. या प्रकरणी महिलेने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

परिमंडळ 10चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक विनोद पाटील याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रणजित गुंडरे, उपनिरीक्षक मन्मथ तोडकर, मोनिका गोम्स, परब, कावळे, राठोड, शिंदे, पिसाळ, नीलम लबडे आदी पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. माहितीनंतर पोलिसांनी आग्रा येथून दोघांना अटक केली.